राजकीय घडामोडी सुरु असताना पुणे शहरात काँग्रेसचे आंदोलन, काय होती मागणी
Pune News Honey Trap : पुणे शहरात काँग्रेसने सोमवारी आंदोलन केले. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी सुरु असताना काँग्रेसने केलेले आंदोलन लक्ष वेधून घेत होते. काय होती काँग्रेसची नेमकी मागणी...
अभिजित पोते, पुणे : राज्यात राजकीय घडामोडी जोरात सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर सर्वांचे लक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यांकडे लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे किती आमदार अजित पवार यांच्यांसोबत गेले आहेत? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. त्याचवेळी काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते पदावर दावा केला जात आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी ज्यांची संख्या जास्त त्यांचा विरोधी पक्षनेता, हे सूत्र असणार असल्याचे सांगितले आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची घोषणा विरोधी पक्षनेता म्हणून झाली आहे. या सर्व घडामोडींमध्ये काँग्रेसने पुणे शहरात आंदोलन केले. आंदोलनात काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर सहभागी झाले.
काय होता विषय
पुण्यात काँग्रेसने आंदोलन केले. हे आंदोलन हनी ट्रॅप प्रकरणात अडकलेले डॉ. प्रदीप कुरुलकर याच्याविरोधात होता. डॉ.प्रदीप कुरुलकर याच्याविरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे, या मागणीसाठी पुण्यात काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. पुण्यातील दहशतवाद विरोधी पथकाच्या कार्यालयाच्या बाहेर काँग्रेसकडून हे आंदोलन झाले. आंदोलनात कसबा विधानसभा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले.
डॉ.प्रदीप कुरुलकरविरोधात काय आहे आरोप
डीआरडीओमधील शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी देशातील गुप्त माहिती पाकिस्तानी गुप्तहेराला दिली. या प्रकरणावरुन त्याला ४ मे रोजी अटक करण्यात आली होती. सध्या येरवडा कारागृहात ते आहेत. देशाची महत्वाची माहिती पाकिस्तानला दिल्यानंतर त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. प्रदीप कुरुलकर हे RSS अन् भाजपशी संबधित आहेत. त्यामुळे त्यांच्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला नाही, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
पॉलीग्राफ टेस्ट होणार का?
प्रदीप कुरुलकर याची पॉलीग्राफ चाचणी करण्याची मागणी तपास संस्थांनी केली आहे. एसटीएसने प्रदीप कुरुलकर आपले जबाब वारंवार बदलत असल्यामुळे त्याची पॉलीग्राफ चाचणी करण्याची मागणी न्यायालयात केली. त्यावर ७ जून रोजी सुनावणी होणार आहे.