राज्यात अजूनही पावसाचे संकट कायम, काय आहे IMD चा अंदाज
अवकाळी पावसाच्या संकटापासून अजून शेतकऱ्यांची सुटका नाही. राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस होणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काढणी करताना पावसाची शक्यता लक्षात घेऊन नियोजन करावे.
पुणे : मार्च महिना पावसाचा महिना झाला आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस सुरु झाला. तो दुसरा व तिसऱ्या आठवड्यातही कायम होता. आता पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के.एस.होसलीकर यांनी यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांवरील संकट अजूनही दूर होण्याची चिन्ह नाहीत. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे कधी होणार याची वाट शेतकरी पाहत आहेत.
23 March 2023, उद्यापासून मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्र, धुळे नाशिक, नंदुरबार यासह विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, सोलापूरही.विदर्भावर अधिक परिणाम होऊ शकतो. प्लीज़ आयएमडी अपडेट पहा
हे सुद्धा वाचा— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 23, 2023
का पडतोय पाऊस
दक्षिण किनारपट्टी भागात ९०० मीटर उंचीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या प्रभावामुळे कोकणातील मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदर्ग जिल्ह्यात पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच नंदुरबार, धुळे, नाशिक, नगर, पुणे, धाराशिव, लातूर, नांदेड आदी जिल्ह्यातही पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
हवामानात अनपेक्षित बदल
गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठा बदल झाला आहे. कधी अचानक तापमान वाढत आहे तर कधी पाऊस पडत आहे. अरबी समुद्रात कमी हवेचा दाब निर्माण झाल्यामुळे हा बदल होत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उद्या सकाळी ऊन व दुपारनंतर आकाशात ढग घोंगावतील. शुक्रवारी पावसाची शक्यता आहे.
विदर्भावर अधिक संकट
विदर्भात अवकाळी पावसाचे संकट अधिक आहे. या ठिकाणी अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे विदर्भातील काही भागांत पुढील आठ दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पंचनामे तातडीने व्हावे
नाशिक जिल्ह्यात 15 ते 19 मार्च या पाच दिवसांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीने 8079 हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले आहे. जिल्ह्यातील 437 गावांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. जवळपास 21 हजार 750 शेतकरी नुकसानग्रस्त झाले आहे. प्रशासन आणि कृषी सहाय्यक यांच्या मदतीने पंचनाम्याचे अहवाल प्रशासनाकडे पाठविण्यात आले आहे. जिल्ह्यातील नांदगाव, पेठ, निफाड, कळवण या तालुक्यांत सर्वाधिक नुकसान झाले आहे. पुन्हा एकदा हवामान खात्याने अवकाळी पावसाचा इशारा दिल्याने शेतकरी धास्तावला आहे. यामुळे तातडीने पंचनामे करावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
बदलत्या हवामानामुळे अवकाळी पावसाच्या भीतीने, पुण्याच्या भोर तालुक्यातील शेतकऱ्यांची गहू पिकाची कापणी करून ते भरडण्याची लगबग पहायला मिळतीय.पावसात भिजून पीक वाया जाऊ नये म्हणून गहू भरडणीची लगबग सुरूवात झाली आहे.