अभिजित पोते, पुणे : राज्यातील अवकाळी अन् गारपीटचे संकट कमी होत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्यात श्रीराम यांचे दर्शन घेत असताना राज्यातील शेतकऱ्यांसमोर गारपीटचे संकट होते. त्यानंतर मुख्यमंत्री सरळ शेतकऱ्यांचा बांधावर गेले. या गारपीट अन् अवकाळीचा आढाव घेत त्यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. मार्च महिन्यातील पंचनामे पूर्ण झाले नसताना राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपीट होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
पाच दिवस पाऊस कायम
वादळी वारे, विजांचा कडकडाट व गारपीट अजून पाच दिवस कायम राहणार आहे. पुणे वेधशाळेने हा अंदाज व्यक्त केला. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश भागांत गारपीट, तर कोकण आणि विदर्भात पावसाची थोडीसी उघडीप राहणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात 15 एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचे वातावरण कायम
कुठे असणार पाऊस
उर्वरित महाराष्ट्रात म्हणजे नाशिक, नगर, पुणे, सातारा सांगली, कोल्हापूर, सोलापूर, जिल्ह्यात व संपूर्ण मराठवाड्यात 15 एप्रिलपर्यंत केवळ अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं, पुन्हा शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणलेत. शेतात गारांचा खच पडला आणि पिकं उद्धवस्त झालीत. गहू, कांदा, द्राक्ष, आंबा आणि भाजीपाला वाया गेलाय. परत पावसाचा अंदाज व्यक्त केल्यामुळे शेतकऱ्यांसमोर संकटाची मालिका कायम राहणार असल्याचे दिसून येत आहे.
शेतकऱ्यांना पंचनाम्यांची प्रतिक्षा
महिन्याभराआधीही अवकाळीनं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचं नुकसान झालं. दरम्यानच्या काळात अधिवेशन झालं. पण अद्याप नुकसान भरपाई जाहीर झाली नाही. आता पुन्हा होतं नव्हतं ते पिकही भूईसपाट झालंय. अयोध्या दौऱ्यावरुन येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक जिल्ह्याच्या पाहणी दौऱ्यावर आले. त्यांनी पुन्हा एकदा पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत. हे सोपस्कार पूर्ण होईलही. पण मदत कशी लवकर शेतकऱ्याच्या खात्यात पडेल, यावर लक्ष दिलं पाहिजे.
हे ही वाचा
गारपीट, अवकाळीनंतर बळीराजापुढे पुन्हा संकट, आता स्कायमेटच्या अंदाजाने वाढवली चिंता