पुणे | 12 सप्टेंबर 2023 : पुणे शहरात १८ जुलै रोजी पुणे पोलिसांनी दोन दशतवाद्यांना अटक केली होती. या दोन्ही दहशतवाद्यांचा संबंध इसिसशी असल्याचे तपासातून उघड झाले होते. पुणे शहरात उघड झालेल्या या इसिस मॉड्यूलमुळे खळबळ माजली होती. राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेत तपास सुरु केला. आता एनआयएकडून या प्रकरणातील सर्व आरोपींच्या मुसक्या आवरण्यासाठी जोरदार कारवाई केली जात आहे. या प्रकरणातील चार आरोपींवर लाखो रुपयांचे बक्षिस एनआयएने जाहीर केले आहे.
पुणे इसिस मॉड्युल प्रकरणातील चार वॉटेंड आरोपींवर प्रत्येकी तीन लाखांचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे. आरोपींना पकडून देणाऱ्यांना हे बक्षिस दिले जाणार आहे. महमद शहनवाज शफीज उम्मा आलम अब्दुल, रिझवान अब्दुल हाजी अली, अब्दुल शेख फय्याज बायपरवाला, ताला लिवाकत खान असे हे आरोपी आहेत. दहशतवादी संघटनेचा प्रचार आणि प्रसार केल्याप्रकरणी हे चार आरोपी एनआयएच्या वॉटेंडच्या यादीत आहे.
NIA ने ISIS पुणे मॉड्यूल प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक केली आहे. हे सर्व आरोपी पुणे शहरातील कोंढवामध्ये एका घरात काम करत होते. याठिकाणी त्यांनी आयईडी असेंबल केले होते. तसेच बॉम्ब बनवण्याची कार्यशाळाही घेतली होती. तसेच सातारा जंगलात जाऊन बॉम्बची चाचणी घेतली होती.
इसिस स्लीपर सेलचा शामिक सादील नाचन याच्या ठाण्यातील घरावरही एनआयएने तीन ऑगस्ट रोजी धाड टाकली होती. त्याला अटकही केली होती. ठाणे जिल्ह्यातील त्याच्या राहत्या घरातून आक्षेपार्ह साहित्य जप्त केले होते. त्यातून देशात विघटन करण्याचा दहशतवाद्यांचा कट उघड झाला होता. नाचनसह झुल्फिकार अली बडोदावाला, मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी, सिमाब नसिरुद्दीन काझी आणि अब्दुल कादिर पठाण यांच्यासह काही इतर संशयित हिंसाचार घडवण्याच्या कटात सहभागी होते, असे तपास संस्थेच्या तपासातून उघड झाले होते.