पुणे, नवी दिल्ली | 2 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहरात इसिस मॉड्यूल प्रकरणात सक्रीय असणारे दहशतवादी राष्ट्रीय तपास संस्था (NIA) पुणे पोलिसांच्या रडारवर होते. या दहशतवाद्यांचा शोध गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होता. पुणे पोलिसांनी 18 जुलै रोजी दोन दशतवाद्यांना पकडले होते. त्यानंतर इसिस मॉड्यूलचा खुलासा तपास संस्थांना झाला होता. यामुळे पुणे एटीएसकडून राष्ट्रीय तपास संस्थेकडे (NIA) हे प्रकरण देण्यात आले. एनआयएने दहशतवाद्यांचा मुसक्या आवरण्यासाठी जोरदार कारवाई सुरु केली होती. अखेरी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला यश आले आहे.
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने इसिस मॉड्यूल प्रकरणात एका दहशतवाद्यास अटक केली आहे. या दहशतवाद्याचे नाव शाहनवाज असल्याचे स्पष्ट झाले आहे. एनआयएने या दहशतवाद्यावर तीन लाखांचे बक्षीस ठेवले होते. तसेच एनआयएच्या मोस्ट वॉटेंड दहशतवाद्याच्या यादीत तो होता. याला शाहनवाज उर्फ शैफी उज्जमा नावाने ओळखले जात होते. या दहशतवाद्यांनी आईईडी बनवण्याचे प्रशिक्षण घेतले होते. तसेच इतर जणांना प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळा घेतली होती. स्फोटाची चाचणी त्यांनी साताऱ्यातील जंगलात केली होती.
दिल्ली पोलिसांनी शाहनवाज याच्या अटकेला दुजोरा दिला आहे. शाहनवाज हा इंजीनिअर होता. पुणे पोलिसांच्या कस्टीडीतून तो फरार झाला होता. तो दिल्लीत राहत होता. त्याची एनआयए आणि दिल्ली पोलीस कसून चौकशी करत आहे. एनआयए आणि पोलिसांनी आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे. तीन दहशतवादी फरार झाले होते. ते दिल्लीत लपलेले होते. त्यात शाहनवाज उर्फ शैफी उज्जमा होता.
एनआयएने दिल्ली पोलिसांना इसिसचे तीन दहशतवादी लपल्याची माहिती दिली होती. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी शोध मोहीम सुरु केली. पोलिसांनी सोमवारी शाहनवाज याला पकडले. आता या प्रकरणातील दोघे फरार दहशतवादी रिजवान अब्दुल हाजी अली आणि अब्दुल्लाह फयाज शेख यांचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलिसांकडून सर्च ऑपरेशन राबवले जात आहे.