पुणे : ‘दोन मन एक होतात, तेव्हा तुम्ही कोण, कुठले या बाबींना अर्थ नसतो, एक मात्र नक्की, तुम्ही कोणी असा, कुठेही असा, तुम्ही एकमेकांसाठी आहात ना? मग तुम्हा दोघांना एक करण्यासाठी तुमची ह्रदये तुम्हाला हमखास शोधून काढतीलच कुठूनही, कसेही’ पत्नी अन् मुलासोबतच्या छायाचित्रांचा कोलाज करुन या कवितेच्या ओळी रेखटणारा आयटी इंजिनिअर त्यांचा खून करु शकेल का? परंतु या संवेदनशील आयटी इंजिनिअरने पत्नी अन् मुलाचा खून करुन स्वत: आत्महत्या केली.पुणे शहरातील या घटनेने अनेकांना धक्का बसला. या प्रकारचे गुढ पोलिसांच्या तपासानंतरच उघड होणार आहे.
सुदिप्तो चंद्रशेखर गांगुली (४४)हा आयटी अभियंता. त्याचे लग्न प्रियांका सुदिप्तो गांगुली (४०) हिच्याशी झाले होते. दोघांना तनिष्क सुदिप्तो गांगुली (८) हा मुलगा होता. या त्रिकोणी कुटुंबाचे भितींवर लावलेल्या कोलाजमुळे कुटुंब प्रेमळ व संवेदनशील होते, हे स्पष्ट होते. सुदिप्तो अन् प्रियांका उच्चशिक्षित होते. परंतु त्यानंतर सुदिप्तो याने पत्नी आणि मुलाचा खून करून आत्महत्या केली.
नेमके काय घडले
सुदिप्तो यांचा लहान भाऊ सिद्धार्थो बंगळूर येथे राहतो. त्याने मंगळवारी सुदिप्तोशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु तो फोन उचलत नव्हता. त्यामुळे सिद्धार्थो याने त्याचा मित्राला सुदिप्तोच्या घरी पाठवले. त्यावेळी घराचा दरवाजा बंद होता. त्यामुळे त्यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली.
असा लागला शोध
पोलिसांकडे तक्रार गेल्यानंतर फोनच्या लोकेशनवरून तपास सुरु केला. फोनचे लोकेशन तो राहत असलेल्या नताशा सोसायटीतच दाखवत होते. त्यामुळे पोलिस सोसायटीत पोचले असता दरवाजा बंद होता. त्यांनी दरवाजा उघडल्यावर एका खोलीमध्ये प्रियांका आणि तनिष्क यांचा मृतदेह आढळला.
तर, दुसऱ्या खोलीत सुदिप्तो यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. सुदिप्तोची पत्नी आणि मुलाचा चेहरा प्लास्टिकच्या रॅपरने बांधलेला होता. यामुळे सुदिप्तोने पत्नी अन् मुलाचा खून करुन स्वत: आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
नोकरी सोडून व्यवसाय
सुदिप्तो यांना आयटीतील चांगल्या पॅकेजची नोकरी सोडून व्यवसाय सुरु केला. तो ऑनलाइन भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होते. मग व्यवसायात तोटा झाल्यामुळे आर्थिक विवंचनेतून हा प्रकार घडला का? अशी एक शक्यता आहे. परंतु सुदिप्तोने याविषयीही कधी सांगितले नसल्याचे त्यांचे भाऊ सिध्दार्थो गांगुली यांनी पोलिसांना सांगितले. घटनास्थळी डायरी सापडली परंतु त्यामध्ये काही आक्षेपार्ह नाही.