जुन्नरचा शौर्य काकडे पत्ते फेकण्यात एक्सपर्ट! 129 फुट लांब पत्ता फेकत इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
जुन्नरच्या चिमुकल्या शौर्यच्या अनोख्या खेळाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या चिमुकल्याने खेळण्याच्या पत्ता 129 फुटापर्यंत फेकण्याचा अनोखा विक्रम केला आहे.
पुणे : पत्ते खेळणं ग्रामिण भागात तितकंस चांगलं मानलं जात नाही. पण याच पत्त्यांच्या जोरावर एका चिमुकल्याने रेकॉर्ड केलाय. जुन्नरच्या चिमुकल्या शौर्य काकडेच्या अनोख्या खेळाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या चिमुकल्याने पत्ता 129 फुटापर्यंत फेकण्याचा (Card Throwing) अनोखा विक्रम केला आहे आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये (India Book Of Record) आपल्या नावाची केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जुन्नर तालुक्यात अनेक ऐतिहासिक परंपरा आहेत. अशा जुन्नर तालुक्यातील वैशाखखेडे या गावात राहणाऱ्या एका चिमुकल्याने रेकॉर्ड केला आहे. हा चिमुकला अवघ्या 7 वर्षाचा आहे. खेळण्याचा पत्ता म्हणजेच प्लेइंग कार्ड जलद आणि सर्वात लांब फेकून एक नवीन विक्रम त्याने केला आहे. त्याच्या अनोख्या कार्याची इंडिया बुक मध्ये नोंद झाली आहे.
शेतकरी कुटुंबातील असणारा शौर्य याला लहानपणापासून खेळाची आवड आहे जिथे आपण दगड एवढ्या लांब फेकू शकत नाही तिथे हा चिमुकला 129 फूट लांब पत्ता सहज फेकू शकतो. ग्रामीण भागात वाऱ्याचा वेग असल्याने पत्ता 129 फुटावर फेकून याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. याशिवाय तलवारबाजी दांडपट्टा लाठी काठी मर्दानी खेळ हा सहजरित्या आणि अप्रतिम सादर करत आहे. इंडिया बुक मध्ये नोंद झाल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे त्याची ही अनोखी असलेली कला सर्वाना आकर्षित करत आहे.
“ज्यावेळी हा रेकॉर्ड झाला तेव्हा मी 129 फुट कार्ड फेकला होता. पण आता मी 150 फुटांपर्यंत फेकू शकतो”, असं शौर्य काकडेने टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं.
“आम्हाला शौर्यच्या कामगिरीचा अभिमान आहे. त्याला भविष्यात अजून पुढे जाण्यासाठी जे काही करावं लागेल, ते करण्यासाठी मी तयार आहे”, असं शौर्यचे वडील किशोर काकडे यांनी सांगितलं.