तर पिंपरी चिंचवड, कसबा पोटनिवडणूक रद्द होणार? कायदेतज्ज्ञाचा मोठा दावा?
राज्यातील राजकीय घडामोडीसंदर्भात पुढील आठवड्यात महत्वाचा निर्णय होणार आहे. या निर्णयामुळे पुणे कसबा पेठ व पिंपरी चिंचवड निवडणूक रद्द होऊ शकते, असा दावा केला जात आहे.
पुणे : पुणे कसबा पेठ आणि पिंपर चिंचवड पोटनिवडणुकीचा अर्ज माघारीचा शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी जोरदार प्रचार सुरु केला आहे. परंतु राज्यातील राजकीय घडामोडीसंदर्भात पुढील आठवड्यात महत्वाचा निर्णय होणार आहे. या निर्णयामुळे पुणे कसबा पेठ व पिंपरी चिंचवड निवडणूक रद्द होऊ शकते, असा दावा कायदेतज्ज्ञ असीम सरोदे ( Asim Sarode ) यांनी केला. कसबापेठ आणि चिंचवडची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी फोनवरून चर्चा केली. मात्र, विरोधकांनी हे आवाहन फेटाळून लावलं आहे. परंतु न्यायालयाच्या निर्णयामुळे निवडणूक रद्द होऊ शकते, असा दावा केला जात आहे.
का रद्द होईल निवडणूक
सर्वोच्च न्यायालयात 16 आमदारांच्या अपात्रतेच्या विषयावर सुनावणी सुरू आहे. ही अंतीम सुनावणी आहे. त्याचा निकाल १४, १५, १६ फेब्रुवारी दरम्यान लागण्याची शक्यता आहे .या निकालात 16 आमदार अपात्र (Disqualification) झाल्यास राज्यात कुणीही सत्ता स्थापन करू शकणार नाही. अशावेळी राष्ट्रपती राजवट (President’s rule) लागू होण्याची शक्यता आहे. भारतीय संविधानातील कलम 172 नुसार, प्रत्येक विधानसभेचा कार्यकाळ हा पाच वर्षे असेल.
पाच वर्षांचा कार्यकाळ झाल्यास विधानसभा आपोआप बरखास्त होते. त्याआधी राष्ट्रपती राजवट लागली किंवा कुणीही सरकार स्थापन करू शकत नसतील तर आपोआप विधानसभा विसर्जित होते. त्यामुळं 14 वी विधानसभा बरखास्त झाल्यास कोणत्याही पोटनिवडणुका घेतल्या जाण्याची कायदेशीर गरज उरत नाही. पर्यायाने पुणे कसबा पेठ व पिंपरी चिंचवड निवडणूक रद्द होईल, असे कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी सांगितले.
निकाल येण्याची शक्यता
सर्वोच्च न्यायालयात राजकीय संघर्षासंदर्भात आणि आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुनावणी सुरू आहे. या सत्तासंघर्षाचा युक्तीवाद जवळपास पूर्ण झाला आहे. लेखी युक्तीवादही सादर झाले. त्यामुळं 14 तारखेपासून होणारी सुनावणी ही अंतीम स्वरुपाची आहे. त्यामुळं निकालसुद्धा येण्याची शक्यता आहे.
या निकालानंतर सरकार पडल्यास कुणाकडेच बहुमत राहणार नाही. कारण काही जण अपात्र ठरतील. त्यामुळं राष्ट्रपती राजवट लावण्याशिवाय दुसरा पर्याय संविधानिकदृष्ट्या उरत नाही, असंही असीम सरोदे यांनी सांगितलं.
आज चित्र स्पष्ट होणार
दुसरीकडे कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा १० फेब्रवारी शेवटचा दिवस आहे. आज शेवटच्या दिवशीही ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत. तर ही निवडणूक करण्यावर महाविकास आघाडी ठाम आहे. त्यामुळे कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होणार की नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.