पुणे | 21 सप्टेंबर 2023 : भारतीय जनता पक्षाचे खासदार गिरीश बापट यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले. त्यानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली नाही. आता सरळ २०२४ मध्येच निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्या निवडणुकीस अजून आठ-दहा महिने आहेत. परंतु भाजपमधील इच्छुकांनी आपले दावे सांगण्यास सुरुवात केली आहे. भाजपमध्ये त्यासाठी चांगली स्पर्धा लागली आहे. आता पुणे शहरात पुन्हा भावी खासदार म्हणून नवीन संसदेच्या फोटोसह बॅनरबाजी करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने ही बॅनरबाजी केली गेली आहे.
पुणे भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी लावलेल्या बॅनर्सची गेल्या दोन दिवसांपासून चर्चा होत आहे. पुणे शहरात गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. अनेक भक्त गणरायाचे दर्शन आणि आरास पाहण्यासाठी बाहेर पडले आहेत. या लोकांपर्यंत आपला भावी खासदार म्हणून संदेश देण्याचे काम जगदीश मुळीक यांनी केले आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीची तयारीचे संकेत त्यांनी दिले आहे. यापूर्वी त्यांनी भावी खासदार म्हणून बॅनर लावले होते.
जगदीश मुळीक यांनी नवीन संसदेच्या फोटोसह स्वतःचा फोटो बॅनर्सवर छापला आहे. त्यामुळे पुणे शहरातून नवीन संसदेत तेच जाणार असल्याचा संदेश त्यांनी दिला आहे. भाजपमध्ये अनेक नावांची चर्चा सुरु असताना जगदीश मुळीक यांनी जोरदार तयार सुरु केल्याचे दिसून येत आहे. जगदीश मुळीक हे पुणे लोकसभेसाठी भाजपकडून इच्छुक आहेत. परंतु अजून कोणाची उमेदवारी निश्चित झालेली नाही.
लोकसभेसाठी गिरीश बापट यांच्या परिवारातून स्वरदा बापट यांचे नाव आगामी उमेदवार म्हणून घेतले जात आहे. माजी महापौर मुरलीधर मोहोळ लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक आहे. तसेच माजी आमदार मेधा कुळकर्णी, माजी खासदार संजय काकडे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. संजय काकडे, मेधा कुळकर्णी आणि मुरलीधर मोहोळ यांना राजकीय अनुभव मोठा आहे. परंतु भाजप श्रेष्ठींचा मनात कोण आहे, हे निश्चित नाही. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा झाली होती.