अभिजित पोते, पुणे : भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा पोटनिवडणुकीची चर्चा रंगली आहे. महाविकास आघाडीतून काँग्रेसने या जागेवर दावा केला आहे. काँग्रेसकडून कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपला दावा केला आहे. यामुळे महाविकास आघाडीत पोटनिवडणुकीवरुन बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केला आहे. निवडणूक बिनविरोध न झाल्यास बापट परिवारातून उमेदवारी देण्यावरही भाजपचा विचार सुरु आहे.
काय केली राष्ट्रवादी काँग्रेसने मागणी
पुणे लोकसभेची जागा काँग्रेसने मोठ्या मनाने राष्ट्रवादी काँग्रेसला द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी केली आहे. विधानसभेच्या वेळी आम्ही कसबा मतदारसंघ काँग्रेसला दिला. आता त्यांनी दिलदारपणा दाखवून लोकसभेची जागा आम्हाला द्यावी, अशी मागणी रुपाली पाटील यांनी केली आहे. कसबा विधानसभेच्या वेळी आम्ही तुम्हाला मदत केली, आता लोकसभा पोटनिवडणुकीत तुम्ही आम्हाला मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेसच्या वरिष्ठांकडे आपण ही मागणी करणार असल्याचे रुपाली पाटील यांनी सांगितले.
विधानसभा दिली लोकसभा द्या
विधानसभेची जागा काँग्रेसला दिली. तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विधानसभेवेळी कसब्यात खूप काम केलं आहे. या भागात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद देखील जास्त आहे. यामुळे ही जागा राष्ट्रवादीला द्यावी, अशी मागणी रुपाली पाटील यांनी केली आहे. दरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना पुणे लोकसभा पोटनिवडणूक आम्ही लढणार आहोत. पुण्यात बिनविरोध निवडणूक होणार नाही, असे म्हटले होते. आता काँग्रेससोबत राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही दावा केला जात आहे.
भाजपची तयारी सुरु
लोकसभा पोटनिवडणूक लागण्याआधीच उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे, काँग्रेसकडून माजी आमदार मोहन जोशी आणि अरविंद शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे. भाजपमधून एकूण पाच जणांच्या नावांची सध्या चर्चा आहे. माजी खासदार संजय काकडे, मुरलीधर मोहोळ, सिद्धार्थ शिरोळे आणि जगदीश मुळीक यांची नावे भाजपमधून चर्चेत आहेत. मात्र बापट यांची सून स्वरदा बापट यांना उमेदवारी देऊन भाजप निवडणूक बिनविरोध करण्याची शक्यता अधिक आहे.
ही ही वाचा
भाजप पदाधिकाऱ्याच्या जीवाला पवार यांच्यांकडून धोका, अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया