अभिजित पोते, पुणे : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पुण्यातील खासदारकीची जागा रिक्त झाली आहे. या रिक्त जागेवर लोकसभा पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. भाजपकडून बापट कुटुंबांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरु आहे. पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सर्वाधिक लॉबिंग भाजपमध्येच सुरू असल्याचं दिसत आहे. या जागेसाठी भाजपमधून एकूण पाच जण स्पर्धेत आहेत. त्यात माजी खासदारांचाही समावेश आहे. तर बापट यांच्या सूनेच्या नावाचीही चर्चा आहे. तर काँग्रेसमधून दोन जणांच्या नावाची चर्चा सुरू आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण असणार? हे जयंत पाटील यांनी जाहीर केले.
येत्या निवडणुकीत पुन्हा राष्ट्रीय पक्ष
राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष म्हणून राष्ट्रवादीचा दर्जा गेला आहे, त्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, देशातील वेगवेगळ्या राज्यात निवडणुका झाल्या आहेत. त्यानंतर काही पक्षांबाबत निवडणूक आयोगाने निर्णय घेतला. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसही आहे. परंतु आगामी निवडणुकांमध्ये पक्ष चांगली कामगिरी करेल अन् पुन्हा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवेल, असे जयंत पाटील यांनी सांगितले. कर्नाटक आणि इतर राज्यातील निवडणूकांमध्ये आम्ही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा पुन्हा सहज मिळवू. हा पक्षासाठी सेटबॅक नाही. कारण राज्यात पक्षाचे घड्याळ हे चिन्ह कायम आहे, असे ते म्हणाले.
अदानी प्रकरण
अदानींच्या प्रकरणात संयुक्त संसदीय समितीच्या चौकशीला विरोध नाही.फक्त जेपीसीच्या उपयोगाबद्दल शंका असल्यानेच पवार साहेबांनी म्हटले होते. यामुळे राष्ट्रवादीने भाजपच्या बाजूने भुमिका घेतली आहे, असे म्हणता येणार नाही.भाजप स्वतः तशी समजत करुन घेत असेल, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
प्रशांत जगताप यांना उमेदवारी?
प्रशांत जगताप हे चांगले कार्यकर्ते आहेत. त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी, अशी आमच्या पक्षातील अनेकांची इच्छा आहे. अर्थात जर निवडणूक होणार असेल तर प्रशांत जगताप यांना उमेदवारी मिळावी अशी पक्षातून मागणी आहे. यावर आम्ही महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा करु, असे लोकसभा पोटनिवडवणुकीच्या विषयावर बोलताना जयंत पाटील यांनी म्हटले.
चंद्रकांत पाटील यांच्या अयोध्या दौऱ्यावर जयंत पाटील यांनी टीका केली. ते म्हणाले की, आयोध्येला जाऊन काही होणार नाही. एकनाथ शिंदे यांना सुबुद्धी देवो यासाठी आम्ही काही प्रमुख नेते विठ्ठलाला साकडे घालणार आहोत. मुख्यमंत्र्यांसह सोळा आमदार जर अपात्र ठरले तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते, या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला.