पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी शरद पवार यांच्या जवळच्या व्यक्तीची तयारी
pune lok sabha by election : पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढवण्यासाठी सर्वच पक्षांमध्ये स्पर्धा सुरु झाली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्या जवळच्या व्यक्तीने आपली दावेदारी केली आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी चर्चा मात्र सुरु झाली आहे.
पुणे : भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा पोटनिवडणुकीची चर्चा रंगली आहे. महाविकास आघाडीतून काँग्रेसने या जागेवर आपला दावा केला आहे. काँग्रेसकडून कसबा मतदार संघातून नुकतेच निवडून आलेले आमदार रवींद्र धंगेकर निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपला दावा केला आहे. यामुळे महाविकास आघाडीत पोटनिवडणुकीवरुन बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे पोटनिवडणुकीसाठी शरद पवार यांच्या जवळच्या व्यक्तीने आपला दावा केला आहे.
कोणी केला दावा
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नावाचा त्यांचे समर्थक भावी खासदार म्हणून उल्लेख करण्यात येत आहे. जगताप यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल केल्या जात आहे. त्याचवेळी शरद पवार यांच्या जवळचे व्यक्ती असलेले दीपक मानकर यांनीही आपली तयारी दर्शवली आहे. वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की, आपण पुण्यातून लोकसभा निवडणूक लढणार आहे. कारण या ठिकाणी दुसरा नेता नाही. परंतु जगताप यांनीही निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे यासंदर्भात पक्ष जो काही निर्णय देईल, तो आम्हाला मान्य असणार आहे.
प्रशांत जगताप यांचे बॅनर
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे भावी खासदार म्हणून शहरात बॅनर झळकले होते. पुण्यातील वडगाव भागात हे बॅनर लावण्यात आले होते. याआधीही प्रशांत जगताप यांचे भावी खासदाराचे बॅनर सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, मात्र आता प्रत्यक्षात बॅनर लावण्यात आले आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघात अद्याप पोटनिवडणूक जाहीर झालेली नाही. त्यातच या जागेवर काँग्रेसने दावा केला आहे. काँग्रेस नेत्यांकडून ही जागा आम्हीच लढवणार असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे पोटनिवडणूक जाहीर होण्याआधीच प्रशांत जगताप यांना भावी खासदार केले गेले आहे. त्याची चर्चा या बॅनरमुळे होताना दिसतेय.
भाजपची तयारी सुरु
लोकसभा पोटनिवडणूक लागण्याआधीच उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे, काँग्रेसकडून माजी आमदार मोहन जोशी आणि अरविंद शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे. भाजपमधून एकूण पाच जणांच्या नावांची सध्या चर्चा आहे. माजी खासदार संजय काकडे, मुरलीधर मोहोळ, सिद्धार्थ शिरोळे आणि जगदीश मुळीक यांची नावे भाजपमधून चर्चेत आहेत. मात्र बापट यांची सून स्वरदा बापट यांना उमेदवारी देऊन भाजप निवडणूक बिनविरोध करण्याची शक्यता अधिक आहे.