प्रदीप कापसे, पुणे, दि. 6 फेब्रुवारी 2024 | केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका घेतल्या. त्यानंतर आयोगाकडून लोकसभेची तयारी सुरु झाली. यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडून तयारी सुरु आहे. त्याचवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लोकसभेची रणनिती तयार केली जात आहे. मनसेने पुणे लोकसभेसाठी जोरदार मोर्चाबांधणी केली आहे. पुणे लोकसभेसाठी राज ठाकरे स्वत: दौरे करत आहेत. तसेच राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांनाही जबाबदारी दिली आहे. मनसेकडून साईनाथ बाबर आणि वसंत मोरे या दोन्ही नेत्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. आता या दोघांपैकी कोणाला उमेदवारी देणार त्याचे स्पष्ट संकेत राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी दिले आहे. त्यासंदर्भात त्यांनी आज पुण्यात महत्वाचे वक्तव्य केले आहे.
शर्मिला ठाकरे यांचं पुण्यातील कार्यक्रमात मोठं वक्तव्य केले आहे. त्या म्हणाल्या, मार्च- एप्रिलला लोकसभा होतील. ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक होणार आहेत. तसेच पुढच्या वर्षी महापालिका निवडणुका होतील. मनसेने चांगले काम पुण्यात केले आहे. कोव्हीड काळात सत्ताधारी मंत्री बंगल्यात बसले होते तेव्हा मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून काम करत होते, अशी जोरदार टीका कोणाचे नाव न घेता शर्मिला ठाकरे यांनी महाविकास आघाडीवर केली.
मनसेचा पुण्यातील उमदेवार कोण असणार? त्यावर बोलताना त्यांनी स्पष्ट संकेत दिले. त्या म्हणाल्या, साईनाथ बाबर यांना मला वरच्या पदावर पहायचं आहे. त्यांना आता महापालिकेत पाठवायचे नाही. त्यांना दिल्लीत पाठवले तर दुधात साखर पडेल.
शर्मिला ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे त्यांनी लोकसभेत वसंत मोरे ऐवजी साईनाथ बाबर यांना पसंती दिल्याची चर्चा सुरु झाली आहे. यामुळे आता साईनाथ बाबर यांनाच लोकसभेची उमेदवारी मिळणार का ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी वसंत मोरे यांनीही आपणास संधी मिळाल्यास लोकसभा लढण्यासाठी आपण तयार असल्याचे म्हटले होते. तसेच वसंत मोरे यांचे भावी खासदार म्हणून पुण्यात बॅनर लागले होते.