पुणे | 12 ऑगस्ट 2023 : पुणे शहराचा विकास होत असताना नागरिकांना विविध सुविधा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच नागरिकांना आणि मुलांना ज्ञान मिळावे, त्यांचा विरुंगुळा व्हावा, यासाठी विविध प्रकल्प तयार केले जात आहे. पुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणी उद्यान असा वेगळा प्रयोग आहे. अनेक वर्षांपासून असलेल्या या उद्यानात प्राण्यांबरोबर अनेक जातीचे साप आहेत. त्याची माहिती विद्यार्थ्यांना होत असते. आता पुणे महानगरपालिकेने असेच एक पाऊल उचलले आहे. पुण्यात डॉग पार्क होणार आहे.
पुणे महानगरपालिकेने डॉग पार्कसाठी जमीन दिली आहे. त्यासाठी तीन एकर जागा दिली आहे. कात्रज-कोंढवा रस्त्यावर ही जागा देण्यात आली आहे. मागील महिन्यात मनपा आयुक्तांनी जागेची पाहणी केली. त्यानंतर हा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी डॉग पार्क उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे एक ते पाच कोटीपर्यंत खर्च होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील प्रस्ताव केंद्रीय प्राणी प्राधिकरणाकडे (Central Zoo Authority) देण्यात आला आहे.
देशातील पहिले डॉग पार्क हैदराबादमध्ये सुरु झाले होते. त्यानंतर मुंबईत पार्क सुरु झाले. या ठिकाणी नागरिक आपल्या पाळीव कुत्र्यांना घेऊन येतात. कुत्र्यांना खेळण्यासाठी ही चांगली जागा असते. पुणे शहरात डॉग पार्कच्या माध्यमातून विविध सुविधा देण्यात येणार आहे.
कुत्र्यांच्या मालकांसाठी वॉकवे, पूप स्कूपर्स आणि कंपोस्टिंग पिट्स, ॲम्फीथिएटर, प्राथमिक उपचारासाठी पशुवैद्यकीय दवाखाना, प्रशिक्षण केंद्र आणि खेळाचे क्षेत्र, हेअर ग्रूमिंग पार्लर असणार आहे. तसेच पाळीव प्राण्यांच्या परवान्याबाबत जनजागृती स्टॉल असेल. यासह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्यात मुंबईनंतर पुणे शहरात असे पार्क होणार आहे. यामुळे श्वान प्रेमींना पुणे महानगरपालिकेकडून चांगली भेट मिळणार आहे. हा प्रकल्प किती दिवसांत पूर्ण होणार आहे, त्याची माहिती अद्याप पुणे मनपाकडून देण्यात आली नाही.