Pune News : शेतकरी- व्यापारी एकत्र, बाजार समितीत कांदा लिलाव बंदच
Onion : केंद्र सरकारने घेतलेल्या कांद्यावरील आयात शुल्कसंदर्भातील निर्णयाविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. पुणे जिल्ह्यातील बाजार समितीत शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. कांदा लिलाव बंद ठेवला जात आहे.
पुणे | 25 ऑगस्ट 2023 : देशातंर्गत बाजारपेठेत कांद्याचे दर वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला. कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लावण्यात आला. केंद्र सरकारच्या या निर्णयास शेतकऱ्यांकडून प्रचंड विरोध होत आहे. केंद्र सरकारला शेतकरी संघटना आणि विरोधकांनीही घेरले आहे. नाशिक आणि पुणे जिल्ह्यात कांदा लिलाव बंद केला जात आहे. आता पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांची साथ मिळाली आहे. व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंद करण्यास समर्थन दिले असून व्यापारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
लिलाव बंद करण्याचा निर्णय
मंचर बाजार समितीत शनिवारपर्यंत कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. केंद्र सरकारने कांद्या निर्यातीबाबत घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांपाठोपाठ व्यापारी या आंदोलनात सहभागी होणार आहे.
व्यापारी का झाले सहभागी
कांद्यावर निर्णयात शुल्क लावण्याचा फटका व्यापाऱ्यांना होत आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांबरोबर व्यापाऱ्यांचेही नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी आणि व्यापारी एकत्र आले आहेत. मंचर बाजार समितीत शनिवारपर्यंत कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
नाफेडचा निर्णयाचा लाभ नाहीच
कांद्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे विरोधक आणि शेतकरी आक्रमक झाले. त्यानंतर राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा केली. यानंतर राज्यातील कांदा नाफेडमार्फत खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ४२१० रुपये प्रतिक्विटंल दराने कांदा खरेदी करण्यात येणार आहे. परंतु नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये नाफेडचे अधिकारीच नसल्यामुळे गुरुवारी लिलाव बंद पाडले. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात नाफेड केंद्र नसल्याने शेतकऱ्यांना कोणताही दिलासा नाही. यामुळे शेतकऱ्यांनी लिलाव बंद केला आहे.
नाशिकमध्ये पालकमंत्र्यांची शिष्टाई
नाशिकमध्ये पालकमंत्री दादा भुसे यांनी घेतलेला पुढाकारामुळे प्रश्न सुटला आहे. दादा भुसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश करून नाफेड आणि NCCF ला पत्र पाठवले आहे. बाजार समितीच्या आवारातच नाफेडने कांदा खरेदी करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या सोबतच नाफेडच्या अधिकाऱ्यांनी या खरेदी दरम्यान उपस्थित राहण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात बाजार समितीच्या आवारात कांद्याचे लिलाव सुरळीत पार पडतील, अशी अपेक्षा आहे.