पुणे | 7 सप्टेंबर 2023 : पुणे महानगरपालिकेच्या वैद्यकिय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत असलेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात लाच घेण्याचा धक्कादायक प्रकार ऑगस्ट महिन्यात घडला होता. या संवेदनशील प्रकरणाची पुणे मनपाने गंभीर दखल घेतली. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमली होती. या समितीने दिलेल्या अहवालात वैद्यकीय महाविद्यालयाचा अधिष्ठाता आशिष बंगिनवार याला 10 लाखांची लाच घेतल्या प्रकरणी दोषी आढळले होते. त्यानंतर आता पुणे महानगरपालिकेने लाच घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये जबर बसणार अशी कारवाई केली आहे.
पुणे मनपाच्या वैद्यकीय शिक्षण ट्रस्टच्या अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी १५ जागा व्यवस्थापन कोट्याच्या आहेत. व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी २१ लाख रुपये शुल्क आकारले जाते. हेच शुल्क अनिवासी भारतीय असल्यास त्यांच्याकडून ३५ लाख रुपये घेतले जाते. तसेच नियमित एमबीबीएस अभ्यासक्रमाचे प्रवेश शुल्क ७ लाख रुपये आहे. ज्या विद्यार्थ्यांचे नियमित कोट्यातून नंबर लागत नाही, त्या विद्यार्थ्यांना एनआरआय कोट्यातून प्रवेश घ्यावा, असे सांगितले जाते. एनआरआय कोट्यातून प्रवेश घेतल्यास पाच वर्षांसाठी सुमारे एक कोटीपेक्षा जास्त रक्कम जाते. त्यामुळे यावर तडजोड करून १६ ते २० लाख रुपये मागितले जातात. मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता आशिष बंगिनवार याने असाच फार्मूला वापरत १६ लाखांची लाच मागितली. त्यातील दहा लाख घेताना ८ ऑगस्ट रोजी पकडले गेले होते.
लाच घेतल्याच्या या प्रकरणाची पुणे मनपाने गंभीर दखल घेतली. मनपाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यांची समिती नेमली. या समितीत महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी भगवान पवार, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे आणि दक्षता विभागाचे उपायुक्त महेश पाटील होते. त्यांनी चौकशी करुन अहवाल आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे सादर केला. त्या अहवालात आशिष बंगिनवार यांना दोषी असल्याचे म्हटले होते.
चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर अधिष्ठाता डॉ. आशिष बंगिनवार यांना महापालिका सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी हा निर्णय घेतला आहे. या कारवाईमुळे लाचखोर कर्मचाऱ्यांमध्ये जबर बसणार आहे.