Pune Metro | पुणे मेट्रोचे तीन टप्पे, आता चार अन् पाचही होणार का?
Pune Metro : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ऑगस्ट रोजी पुणे मेट्रोच्या दोन प्रकल्पांचे उद्घाटन केले. त्यानंतर हे दोन्ही मार्ग पुणेकरांसाठी सुरु झाली आहेत. पुणेकरांसाठी तिसऱ्या टप्प्याचे काम वेगाने सुरु आहे. येत्या काही महिन्यात हा मार्ग सुरु होईल. त्याचवेळी ४ आणि ५ चर्चा सुरु झालीय.
पुणे | 21 सप्टेंबर 2023 : पुणे मेट्रोचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ऑगस्ट रोजी उद्घाटन केले होते. त्यानंतर सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड हा एक मार्ग आणि गरवारे कॉलेज स्टेशन ते रूबी हॉल असा दुसरा मार्ग सुरु झाला. या मेट्रोला पुणेकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता मेट्रोचा तिसरा टप्पा असलेला शिवाजीनगर ते हिंजवडी लवकरच सुरु होणार आहे. त्याचे काम वेगाने सुरु आहे. त्याचवेळी पुणे मेट्रोच्या चार आणि पाच मार्गाची चर्चा सुरु झाली आहे.
तिसरा मार्ग होणार सुरु
पुणे मेट्रोचा पहिला मार्ग पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट होता. हा मार्ग 16.589 किलोमीटरचा होता. त्यात भूमिगत 5 स्थानके आहेत. तसेच एलिव्हेटेड 9 स्थानके आहेत. पुणे मेट्रोचा दुसरा टप्पा वनाज ते रामवाडी आहे. हा मार्ग जवळपास 14 किलोमीटरचा आहे. या मार्गावर एलिव्हेटेड 9 स्थानके आहेत. हे दोन मार्ग सुरु झाले असून आता शिवाजीनगर ते हिंजवडी या मार्गाचे काम वेगाने सुरु आहे. हा मार्ग 23 किलोमीट लांबीचा आहे.
पुणे मेट्रोच्या चार, पाचसाठी तयारी
पुणे मेट्रोचे तीन मार्ग झाल्यानंतर आता पुणे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (PMRDA) चार आणि पाच मार्गाचा विचार सुरु केला आहे. पुणे महानगरपालिकेने 113.23 किलोमीटरच्या या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. पीएमआरडीएकडून या दोन्ही मार्गांचे प्रोजेक्ट रिपोर्ट दिल्ली मेट्रोकडून मागवण्यात आले आहे. मेट्रो लाईन चार हा शिवाजीनगर ते लोणी काळभार असा मार्ग असणार आहे. तर मेट्रो पाच मार्ग हा खडकवासला ते खराडी असणार आहे.
सल्लागार समितीची नियुक्ती
युनिफाइड मोबिलिटी ट्रान्सपोर्ट अथॉरिटी आता एक सल्लागार समितीची नियुक्ती करणार आहे. ही समिती चार आणि पाच मार्गाची आर्थिक व्यवहार्यता, जोखीम, भाडे आणि इतर तांत्रिक बाबींचा अभ्यास करुन अहवाल देणार आहे. ही समिती पीपीई किंवा ईपीसी कोणत्या पद्धतीने काम करावी, याचाही अहवाल देणार आहे. समिती रिअल इस्टेट बाजाराचे मूल्यांकन शोधून काढेल आणि भांडवली खर्चासाठी वित्तपुरवठा सुचविण्यास आणि महसूल संभाव्यतेला अनुकूल करण्यासह महसूल मॉडेल विकसित करेल.