Pune Metro | पुणेकरांची मेट्रोची क्रेज संपली का? चार महिन्यांत पाहा काय झाला बदल
Pune Metro : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ऑगस्ट रोजी पुणे मेट्रोच्या दोन प्रकल्पांचे उद्घाटन केले होते. त्यानंतर पुणे मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचे काम वेगाने सुरु आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात वाढते मेट्रोचे जाळे वाढत आहे. मात्र प्रवाशांची मेट्रोकडे पाठ फिरली आहे.
रणजित जाधव, पुणे | 8 डिसेंबर 2023 : पुणे मेट्रोच्या दोन मार्गांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १ ऑगस्ट रोजी झाले होते. सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड आणि गरवारे कॉलेज स्टेशन ते रूबी हॉल हे दोन मार्ग पुणेकरांना मिळाले. यानंतर पुणेकर मेट्रोचे तिसरा मार्ग शिवाजीनगर ते हिंजेवाडीचे काम वेगाने सुरु आहे. येत्या एप्रिलपर्यंत तिसऱ्या मार्गावर मेट्रो धावणार आहे. पुणेकरांना आकर्षित करण्यासाठी शनिवार आणि रविवारी मेट्रोमधून प्रवासासाठी सुट दिली जात आहे. परंतु आता मात्र पुणेकरांची मेट्रोची क्रेज संपली की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या चार महिन्यांत मेट्रोमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.
चार महिन्यांत सहा लाख प्रवासी कमी
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात वाढते मेट्रोचे जाळे वाढत आहे. मात्र प्रवाशांची मेट्रोकडे पाठ फिरली आहे. पिंपरी ते सिव्हिल कोर्ट आणि वनाज ते रुबी हॉल या दोन्ही मार्गावर नोव्हेंबर महिन्यात फक्त 14 लाख 18 हजार प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला आहे. गेल्या चार महिन्यांत दिवसेंदिवस मेट्रो प्रवाशांची संख्या कमी होताना पाहायला मिळत आहे. ऑगस्ट महिन्याची तुलना केल्यास नोव्हेंबरमध्ये सहा लाखांनी प्रवासी संख्या घटली आहे.
ऑगस्ट महिन्यांत होते 20 लाख 47 हजार प्रवासी
काही महिन्यांपूर्वी शहरातून भुयारी मेट्रो सुरू झाली. यामुळे नागरिकांमध्ये सुरुवातीचे काही दिवस उत्सुकता होती. दररोज कार्यालयात जाणारे किंवा इतर कामानिमित्त प्रवास करणारे पुणेकर मेट्रोचा वापर करू लागले. यामुळे ऑगस्ट महिन्यात 20 लाख 47 हजार प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला होता. यानंतर प्रत्येक महिन्यात मेट्रोची प्रवासी संख्या दिवसेंदिवस कमी होत गेली. नोव्हेंबर महिन्यात प्रवासी संख्या 14 लाखांच्या घरात आली त्यामुळे उत्पन्नामध्ये देखील मोठी घट झाली आहे.
का कमी होत आहे प्रवाशी
मेट्रोला कनेक्टेड असणारी पीएमपीची अपुरी फिटर सेवा हे प्रवासी कमी होण्याचे मुख्य कारण आहे. कारण शेअर रिक्षाचे जादा दर आहेत. तसेच मेट्रो स्थानकावर प्रवाशांना वाहने लावण्यासाठी पार्किंगच्या जागेचा अभाव आहे. लोकलच्या तुलनेत मेट्रोचे तिकीट दर अधिक आहे. यामुळे मेट्रोचा वापर कमी होत आहे.
मेट्रो प्रवाशी संख्या उत्पन्न आणि घट
- ऑगस्ट महिन्यात प्रवाशांची संख्या 20 लाख 47 हजार होती यामधून 3 कोटी 7 लाख रुपये उत्पन्न मिळाले होते
- सप्टेंबर महिन्यात प्रवाशांची संख्या 20 लाख 23 हजार होती यामधून 2 कोटी 98 लाख रुपये उत्पन्न मिळाले होते
- ऑक्टोबर महिन्यात प्रवाशांची संख्या 16 लाख 72 हजार होती यामधून 2 कोटी 48 लाख रुपये उत्पन्न मिळाले होते
- नोव्हेंबर महिन्यात प्रवाशांची संख्या 14 लाख 18 हजार होती यामधून 2 कोटी 20 लाख रुपये उत्पन्न मिळाले