Pune News : पुणे, पिंपरी चिंचवडकरांसाठी मेट्रोची महत्वाची बातमी, या नवीन मार्गावर धावणार मेट्रो
pune metro news : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ऑगस्ट रोजी पुणे मेट्रोच्या दोन प्रकल्पांचे उद्घाटन केले. यानंतर मेट्रो पुणेकरांसाठी सुरु झाली. पुणेकरांनी या मेट्रोस चांगलाच प्रतिसाद दिला आहे. आता मेट्रोचा आणखी विस्तार होणार आहे.
पुणे | 28 ऑगस्ट 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १ ऑगस्ट रोजी पुणे मेट्रोच्या दोन मार्गाचे उद्घाटन झाले होते. सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड आणि गरवारे कॉलेज स्टेशन ते रूबी हॉल हे दोन मार्ग पुणेकरांना मिळाले. या मार्गावर प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांकडून मिळणाऱ्या या प्रतिसादामुळे पुणे मेट्रोची वेळ वाढवण्यात आली आहे. आता सकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत मेट्रो सुरु राहणार आहे. पुणेकरांकडून मेट्रो प्रवाशाला प्राधान्य दिले जात असल्याने महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
काय घेतला निर्णय
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेट्रो प्रकल्पासंदर्भात बैठक घेतली. या बैठकीत पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला. पुणे मेट्रोचे नेटवर्क वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे निगडी ते कात्रज अशी मेट्रो पुण्यात सुरु होणार आहे. पुणे मेट्रोचा विस्तार कात्रजपर्यंत करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. अजित पवार यांच्या बैठकीत या मागणीला मान्यता देण्यात आली.
राज्य सरकार मदत करणार
पुणे मेट्रोचा विस्तार करण्यासाठी राज्य सरकार मदत करणार आहे. अर्थमंत्री म्हणून आपण या प्रकल्पासाठी शक्य ती सर्व मदत देऊ, असे अजित पवार यांनी सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून या प्रकल्पासाठी मदत मागण्यात येणार आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीत त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली. तसेच पिंपरी-चिंचवड मनपाही या मेट्रोसाठी आपला वाटा उचलणार आहे. यामुळे निगडी ते कात्रज अशी सरळ मेट्रो सुरु होणार आहे.
मेट्रोचा हा चौथा मार्ग
पुणे मेट्रोचा निगडी ते कात्रज हा चौथा मार्ग असणार आहे. या मार्गातील काही भाग अंडरगाऊंड असणार आहे. सध्या पिंपरी ते स्वारगेट असा हा प्रकल्प तयार करण्याचे काम सुरु आहे. निगडी ते कात्रज असा मार्ग सुरु झाल्यावर त्याचा फायदा पुणे शहर, आकुर्डी, पिंपरी चिंचवडमधील लोकांना फायदा होणार आहे.