Pune News : पुणे शहरातील या कॉलेजचा असाही विक्रम, देशात ठरले नंबर वन
Pune News : पुणे शहरात कॉलेजने नवीन विक्रम केला आहे. देशात प्रथमच अशी कामगिरी या महाविद्यालयाने केली आहे. यामुळे पुणेकरांनी पुन्हा करुन दाखवल्याचे म्हणावे लागले.
पुणे | 26 ऑगस्ट 2023 : पुणे शहर शिक्षणाचे माहेरघर म्हटले जात आहे. विविध प्रकारच्या शिक्षणाची दारे पुण्यात खुली झाली आहेत. पुणे विद्यापीठ देशातील नामांकीत विद्यापीठांमध्ये मानले जाते. तसेच कृषी, अभियांत्रिकी, वैद्यकीय, तंत्रज्ञान शिक्षणाच्या अनेक शाखा पुण्यात आहेत. देशातील लष्कराली बळ देणाऱ्या अनेक संस्था आहेत. राष्ट्रीय संरक्षण अकादमी म्हणजे एनडीए पुण्यात आहे. आता पुण्यातील कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरींगने नवीन विक्रम केला आहे. देशात अशी कामगिरी करणारे ते एकमेव कॉलेज ठरले आहे.
काय केले मिलिटरी इंजिनिअरींग कॉलेजने
पुणे येथील मिलिटरी इंजिनिअरींग कॉलेजने हरित उर्जा उत्पादनासाठी महत्वाचे पाऊल टाकले आहे. कॉलेजने 5 मेगावॅटचा सोलार प्रकल्प कार्यान्वित केला आहे. या प्रकल्पाची क्षमता वाढवून 7 MW पर्यंत झाली आहे. देशातील एखाद्या कॉलेजने सोलार प्रकल्पाची उभारणी करण्याचा विक्रम प्रथमच केला आहे. 2021 पासून कॉलेज या प्रकल्पावर काम करत होता. आधी 2 मेगा वॅटचा प्रकल्प कॉलेजने उभारला. त्यानंतर आता 5 MW चा सोलार प्रकल्प उभारुन ही क्षमता 7 MW पर्यंत केली आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सोलर मोहिमेतंर्गत कॉलेजने हा प्रकल्प उभारला आहे.
किती होणार बचत
सौर उर्जा प्रकल्पामुळे कॉलेजने विजेवर होणार वार्षिक 6.5 कोटी रुपयांचा खर्च वाचवला आहे. कॉलेजने हा प्रकल्प महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ग्रीडशी जोडला आहे. या एकत्रीकरणामुळे मिलिटरी कॉलेजमध्ये निर्माण होणारी वीज खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमी, कमांड हॉस्पिटल पुणे, मिलिटरी हॉस्पिटल खडकी आणि बॉम्बे इंजिनियर ग्रुप आणि सेंटर, खडकी या पुण्याजवळील महत्त्वाच्या संस्थांना मिळत आहे.
भारताचा अक्षय उर्जेवर भर
देशात सर्वाधिक विजेचे उत्पादन कोळसाच्या माध्यमातून होते. त्याऐवजी अक्षय ऊर्जा स्त्रोतांवर आता भर दिला जात आहे. सन 2070 पर्यंत शून्य टक्के कार्बन उत्सर्जनाचे लक्ष ठेवले आहे. त्यासाठी विविध विभागाकडून प्रयत्न केले जात आहे. यामुळे देशात सौर ऊर्जा आणि पवन उर्जेच्या माध्यमातून विजेच्या निर्मितीवर भर दिला जात आहे.