Pune MNS : राज्यात सुरू झालेलं भारनियमन सरकारचं अपयश, मनसेचा आरोप; पुण्यात महावितरण कार्यालयाबाहेर आंदोलन
वीजटंचाईचा प्रश्न लवकर सोडवा, अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा मनसेने दिला आहे. शहराध्यक्ष साईनाथ बाबर (Sainath Babar) यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
पुणे : वीजप्रश्नावरून पुण्यात मनसे (Pune MNS) आक्रमक झाली आहे. आज मनसेने महावितरणच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले. भारनियमन आणि सिक्युरिटी डिपॉझिटचा मनसेने यावेळी विरोध केला. राज्यात सुरू झालेले भारनियमन (Load shedding) हे राज्य सरकारचे अपयश आहे. वीजटंचाईचा प्रश्न लवकर सोडवा, अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा मनसेने दिला आहे. शहराध्यक्ष साईनाथ बाबर (Sainath Babar) यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. घोषणाबाजी करत महावितरणच्या कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आले. राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात वीजेची टंचाई निर्माण झाली आहे. उन्हाळा असल्याने वीजेच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या राज्यात भारनियमन सुरू आहे. त्यामुळे सर्वांचेच हाल होत आहेत. यावर राज्य सरकारने त्वरीत तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.
कोळसा टंचाईटे संकट
कोळसा टंचाई आणि त्यामुळं उभे राहिलेले वीज संकट याचा सामना सध्या महाराष्ट्र करतोय. राज्यातील अनेक भागात सध्या भारनियमनाला सुरुवात झालीय. यावर तोडगा काढण्यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात एक बैठकही दोन दिवसांपूर्वी झाली होती. त्यावेळी नागरिकांनी वीज जपून वापरण्याचं आवाहन त्यांनी केले. तसेच राज्यात सुरू असलेले भारनियमन कधीपर्यंत चालणार हे सांगता येत नाही. भारनियमनाचं शेट्यूल आम्ही वृत्तपत्रात देऊ. तसंच लोकांना व्हॉट्सअॅप, मेसेजद्वारेही देऊ, असेही राऊत म्हणाले होते. तर कोल इंडिया लिमिटेड ही कंपनी देशातल्या सर्व वीज कंपन्यांना कोळसा पुरवते. त्यांच्या व्यवस्थापनामुळे समस्या निर्माण झाली आहे, असे खापर ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आठवडाभरापूर्वी फोडले होते.