योगेश बोरसे, Tv9 मराठी, पुणे : पुण्यात एमपीएससीच्या परीक्षांसाठी (MPSC Exam) अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं गेल्या 12 तासांपासून आंदोलन सुरु आहे. एमपीएससीचा अभ्यासक्र बदलल्यामुळे त्याविरोधात विद्यार्थ्यांचं गेल्या 12 तासांपासून आंदोलन सुरु आहे. विद्यार्थी आक्रमक झाल्याने आता पोलीसही सतर्क झाले आहेत. आंदोलनस्थळी 300 ते 400 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. अनेक तास उलटले तरी विद्यार्थी आंदोलन मागे घ्यायला तयार नाहीत. याबाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठोस आश्वासन देत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका या विद्यार्थ्यांची आहे.
विशेष म्हणजे काँग्रेस नेत्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेतली आहे. काँग्रेस नेत्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांशी चर्चा केलीय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वत: या आंदोलनाची दखल घेतल्याची माहिती समोर आलीय.
याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सुद्धा या आंदोलनाची दखल घेतलीय. त्यांनी आपल्या पक्षाचे पदाधिकारी अंकुश काकडे यांना विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेण्याच्या सूचना केल्या होत्या.
आंदोलक विद्यार्थी आज सकाळपासून पुण्यातील अलका चौकात ठिय्या मांडून बसलेले आहेत. एमएपीएसचं अभ्यासक्रम 2023च्या ऐवजी 2025 पासून बदलण्यात यावं, अशी एकच मागणी या विद्यार्थ्यांची आहे.
विद्यार्थ्यांना नव्या अभ्यासक्रमानुसार अभ्यास करण्यासाठी कमी वेळ मिळाला आहे. त्यामुळे पुढच्या दोन वर्षांनी अभ्यासक्रम बदलण्यात यावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
विशेष म्हणजे विद्यार्थ्यांची विभागीय आयुक्तांशी देखील चर्चा झालीय. मात्र चर्चेअंती कोणताही तोडगा निघालेला नाहीय. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.