Pune-Mumbai Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाची वाहतूक कोंडी सुटणार, ‘एमएसआरडीसी’ने केला असा प्रस्ताव
Pune-Mumbai Expressway : पुणे-मुंबई महामार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होते. तसेच अपघात होत असतात. अनेक अपघात वाहनचालकांनी नियम मोडल्यामुळे होतात. परंतु आता या सर्व समस्या सुटणार आहे. त्यासाठी प्रस्ताव तयार केला आहे.
पुणे | 11 सप्टेंबर 2023 : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग बांधताना पुढील २५ वर्षांचा विचार केला गेला होता. परंतु आता हा महामार्ग वाहतूक कोंडी आणि वारंवार होणाऱ्या अपघाताच्या चक्रात अडकला आहे. या महामहामार्गावरील सर्व समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने म्हणजे ‘एमएसआरडीसी’ महत्वाचे पाऊल उचलले आहे. या एक्स्प्रेस मार्गासाठी एक प्रस्ताव तयार केला आहे. त्यामुळे पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार आहे.
काय आहे ‘एमएसआरडीसी’चा प्रस्ताव
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक अधिक जलद आणि सुरक्षित करण्यासाठी हा मार्ग आठपदरी करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) राज्य सरकारकडे हा प्रस्ताव पाठवला आहे. हा प्रस्ताव राज्य शासनाने मंजूर केल्यास मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आठपदरी होणार आहे आणि त्यामुळे वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. राज्य शासनाने प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर द्रुतगती मार्गाचे काम सुरू झाल्यापासून तीन वर्षांत काम पूर्ण करण्यात येणार आहे.
महामार्गावर सात ब्लॅक स्पॉट
पुणे-मुंबई महामार्गावर होणारे अपघातासंदर्भात ब्लॅक स्पॉटही शोधण्यात आले आहे. त्यात खेड शिवापूर येथील दर्गा फाटा, चेलाडी, सारोळा पूल, शिंदेवाडी, पंढरपूर फाटा, पेपर मिल आणि खंडाळा हे ब्लॅक स्पॉट आहे. या ठिकाणी अपघात टाळण्यासाठी इंटेलिजन्स ट्रॅफीक मॅनेजमेंट प्रणाली (ITMS) प्रकल्प राबण्यात येणार आहे. त्यासाठी 430 हायटेक सीसीटीव्ही कॅमरे संपूर्ण मार्गावर इंस्टाल केले जाणार आहे. हे काम ऑक्टोंबर महिन्यापर्यंत पूर्ण होणार आहे.
काय आहे आयटीएमएस प्रणाली
आयटीएमएस प्रणालीत तंत्रज्ञानाचा वापर करुन महामार्गावर नियोजन केले जाते. सर्व वाहतुकीचे नियंत्रण सॅटेलाईटद्वारे केले जाणार आहे. त्यासाठी ड्रोनचा वापर केला जाणार आहे. महामार्गावर प्रवेश करणाऱ्या प्रत्येक गाडीवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून वॉच ठेवली जाणार आहे. लेन कटींग करणाऱ्या वाहनांची नोंद होईन त्यांच्यावर त्वरित कारवाई होणार आहे. अपघात रोखण्यासाठी आयटीएमएस प्रणाली खूप महत्वाची ठरणार आहे. यामुळे मार्गावर वाहतुकीची शिस्त पाळली जाईल.