रणजित जाधव, पुणे : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर विचित्र अपघात झालाय. एकूण अकरा वाहनं एकमेकांना धडकली आहेत. या अपघातानंतर एक चारचाकी तर अक्षरशः दुसऱ्या वाहनावर उभी आहे. खोपोली एक्झिटजवळ हा अपघात झालाय. सुदैवाने यात कोणती जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. काही जखमींना रुग्णालयात भरती केलं जातंय. वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली आहे. अपघातात एकूण अकरा वाहनं एकमेकांना धडकली आहेत. पुणे-मुंबई महामार्गावर वारंवार अपघात होत असतात.
वाहतूक ठप्प
पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर विचित्र अपघातानंतर वाहतूक ठप्पा झाली आहे. घटनास्थळी मदत कार्य सुरु करण्यात आले आहे. या अपघातात ११ वाहनांचे नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे-मुंबई महामार्गावर अपघात वाढत आहेत. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एक ट्रकने अकरा वाहनांना ठोकर दिल्याने हा भीषण अपघात झालाय. अपघातानंतर ट्रक चालक पसार झालाय, रायगड पोलीस त्याचा शोध घेत आहे. बोरघाट उतरत असताना ट्रकवरील चालकाचा ताबा सुटला असावा अथवा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
करणार हा बदल
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर शिंगरोबा मंदिराच्या मागे असलेल्या दरीत खासगी बस मागील आठवड्यात कोसळली होती. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर या महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी मोठी योजना हाती घेतली आहे. सुमारे १६० कोटी रुपये खर्च करुन संपूर्ण महामार्गावर सीसीटीव्हीचे जाळे करणार आहे.
आयटीएमएस यंत्रणा
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर आयटीएमएस म्हणजेच इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम बसविण्यात येणार आहे. आता परिवहन विभाग, महामार्ग पोलिस व ‘एमएसआरडीसी’ने त्यासाठी हालचाली सुरु केल्याय. यासाठी लवकरच सर्व्हेला सुरुवात होणार आहे.
काय आहे तंत्रज्ञान
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वर आता वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. वाहनांनी ठरवून दिलेली मार्गिका सोडू नये यासाठी ‘आयटीएमएस’ काम करणार आहे. वाहतुकीची शिस्त पाळणे, अपघात टळाणे, अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळावी यासाठी अत्याधुनिक यंत्रणा बसविणार आहे.