Pune News | पुणे शहरात प्रसिद्ध हॉटेलवर मनपाची मोठी कारवाई, बोरघाटात पुन्हा अपघात
Pune News | पुणे शहरातील प्रसिद्ध हॉटेलवर महानगरपालिकेने कारवाई केली आहे. मनपाने हॉटेलचे सुमारे 3500 स्केअर फूट बांधकाम तोडले आहे. तसेच मनपाची ही कारवाई यापुढेही सुरु राहणार आहे. मनपाच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
पुणे | 21 सप्टेंबर 2023 : पुणे शहरात एफसी रोडवर हॉटेल वैशाली प्रसिद्ध आहे. या हॉटेलवरील अनधिकृत बांधकामावर पुणे मनपाच्या पथकाने कारवाई केली. हॉटेलचे 3500 स्केअर फूट बांधकाम तोडले आहे. बांबूच्या साह्याने उभारलेल्या हे शेड पुणे मनपाच्या अभियंत्याच्या देखरेखीखाली तोडण्यात आले. हॉटेलच्या साइड मार्जिन आणि गच्चीवरील अतिक्रमणासंदर्भात ही कारवाई करण्यात आल्याचे पीएमसीचे उपअभियंता सुनील कदम यांनी सांगितले. मनपाची अनधिकृत बांधकामावर कारवाई यापुढे सुरु राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुणे बोरघाटात पुन्हा अपघात
पुणे बोरघटात पुन्हा अपघात झाला आहे. गुरुवारी सकाळी 6 वाजतच्या सुमारास पुण्यावरुन मुंबईला जाणाऱ्या लेनवर हा अपघात झाला. अपघातात कंटेनर स्लिप होऊन दुसऱ्या लेनवर कंटेनर आदळला. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. दोन्ही वाहनामधील चालकांना किरकोळ जखम झाली. परंतु गाड्या धडकल्यामुळे रस्त्याच्या मधोमध आल्या. त्यामुळे घाट परिसरात मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे.
आनंदाचा शिधाचे वाटप
पुणे जिल्ह्यात ७३ टक्के नागरिकांना आनंदाचा शिधाचे वितरण करण्यात आले. आंबेगाव तालुक्यातील ४४ हजार १०० लाभार्थ्यांपैकी ३० हजार ८९० जणांना आनंदाचा शिधा देण्यात आला. बारामती तालुक्यात ८३ हजार ९५० लाभार्थ्यांपैकी ४९ हजार ३१९ जणांना शिधाचे वाटप करण्यात आले. भोर तालुक्यात २६ हजार ८०० लाभार्थ्यांपैकी २१ हजार ५७४ तर दौंड तालुक्यातील ५२ हजार १०० लाभार्थ्यांपैकी ३३ हजार ३४ लाभार्थ्यांना शिधाचे वाटप केल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. सीमा होळकर यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस, बावनकुळे पुणे दौऱ्यावर
भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे गुरुवारी पुणे दौऱ्यावर येणार आहे. यावेळी मानाच्या कसबा गणपतीसह दगडूशेठ गणपतीचे ते दर्शन घेणार आहे. तसेच इतर सार्वजनिक गणपती मंडळाला ते भेटी देणार आहे. संध्याकाळी ६ वाजल्यापासून त्यांचा भेटीचा कार्यक्रम आहे. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपच्या नवीन शहर कार्यकारणीची बैठक होणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे पुण्यावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.
गोपीचंद पडळकर यांचा फोटोला जोडे मार आंदोलन
पुण्यातील खेड तालुक्यातील राजगुरूनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर यांच्या फोटोला जोडे मार आंदोलन करत निषेध करण्यात आलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात आले. आंदोलन राजगुरुनगर येथील पुणे नाशिक महामार्गावर झाले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत रास्तारोको आंदोलन केले. तसेच पडळकर यांच्या फोटोला जोडे मारले.