पुणे, दि.22 जानेवारी 2024 | पुणे शहर महानगरपालिकेने महत्वाचा बदल केला आहे. पुणे मनपाच्या या निर्णयामुळे आता रस्त्यांवर विजेचा धक्का बसणार नाही. पुणे महापालिकेने शहरात फायबर रिइन्फोर्स पॉलिमर म्हणजेच ‘शॉक प्रूफ’ विद्युत खांब बसविण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात मनापातर्फे एक हजार विद्युत खांब बसविण्यात येणार आहेत. त्यात म्हाळुंगे रस्ता, सूस या भागाचा समावेश आहे. यामुळे पावसाळ्यात विजेचा खाबांमध्ये विद्युत प्रवाह उतरुन मृत्यू टळणार आहे.
पावसाळ्यात विद्युत खांबांमध्ये विद्युत प्रवाह उतरत असतो. त्यामुळे रस्त्यावरुन जाणाऱ्या लोकांना विजेचा धक्का बसतो. त्यात मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच पतंग उडवताना मुलांचा विद्युत खांबांना स्पर्श होतो. या घटनेत विजेचा धक्का बसण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे विद्युत खांबांमध्ये बदल करण्याच्या हालचाली मनपा प्रशासनाकडून सुरु करण्यात आल्या. त्यानुसार सुरक्षित असलेले ‘एफआरपी’ शॉक प्रूफ विद्युत खांब बसवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्याची अंमलबजावणी सुरु केली जात आहे.
पुणे मनपातर्फे पहिल्या टप्प्यात एक हजार खांब बदलण्यात येणार आहे. जुने खांब काढून नवीन शॉक प्रूफ असलेले विद्युत खांब टाकले जाणार आहे. विशेष म्हणजे जुन्या विद्युत खांबांच्या तुलनेत नवीन एफआरपी खांब ५ ते १० टक्के स्वस्त आहेत. यामुळे नागरिकांचे लाख मोलाचे जीव वाचणार आहे. तसेच मनपाची बचत होणार आहे. एफआरपी विद्युत खांब मजबूत, पारदर्शी, कमी वजनाचे आहेत. या खांबांना गंज लागत नाही. यामुळे दीर्घकाळ ते टिकतात. आगीसारख्या घटनांचा या खांबांबर काहीच परिणाम होत नाही.
महापालिकेला सध्याच्या विद्युत खांबाच्या अर्थिंग आणि देखभाल दुरुस्तीसाठी खर्च करावा लागतो. दरवर्षी पावसाळ्याआधी १० ते १५ लाख रुपयांचा खर्च होत असतो. परंतु आता नवीन ‘एफआरपी’ खांबाला अर्थिंगची गरज नाही. यामुळे दरवर्षी अर्थिंगच्या होणाऱ्या खर्चात बचत होणार आहे.