Pune dilapidated wadas : मोडकळीस आलेल्या 450 वाड्यांना पुणे महापालिकेची नोटीस, तर रहिवासी काही वाडे सोडायला तयार नाहीत!
आम्हाला नोटीस आली की वाईट वाटते. मुलांच्या नोकऱ्या खूप चांगल्या नाहीत. त्या खासगी आहेत. त्यामुळे आर्थिक भार सोसत नाही, असे येथील रहिवाशांचे मत आहे.
पुणे : पुण्यात पावसाळा सुरू झाला, की पुणे महापालिकेने शहरातील जुन्या वाड्या आणि इमारतीना नोटीस (Notice) पाठवायला सुरुवात केली आहे. शहरातील जुने वाडे धोकादायक परिस्थिती असल्याने त्यांना रिकामी करा अथवा पाडा अशी नोटीस महापालिकेने या वाड्यांवर लावली आहे. यावर्षी देखील पुणे पालिकेने (Pune Municipal corporation) जवळपास 450 वाड्यांना नोटीस देण्यात आली आहे. पुण्यातील अती धोकादायक जुने वाडे पालिकेकडून पाडण्यातही आले आहेत. या वाड्याची अवस्था फार बिकट आहे. महापालिकेने या वाड्यांच्या श्रेणी केल्या आहेत. यामध्ये एकूण 478 वाडे आहेत. त्यातील 28 वाडे महापालिकेने गेल्या काही महिन्यांत पाडले आहेत. मुळातच हे वाडे 70-80 वर्ष जुने आहेत. अत्यंत धोकादायक (Dangerous) स्थितीत हे वाडे असून त्यातील अनेक वाडे कोणत्याही स्थितीत पडण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे ते खाली करणाच्या या नोटीस आहेत.
वाड्यांच्या श्रेणी
- C1 – एकूण 28, कारवाई 28
- C2 – एकूण 316 कारवाई – 11
- C3 – एकूण 134 कारवाई – 9
‘बिनव्याजी कर्ज द्यावे’
पुणे महापालिका पावसाळा आला, की वाड्याना नोटीस देते. मात्र परत काहीच करत नाही. त्यामुळे आशा वाड्यांचा इतिहास जपला पाहिजे. वाड्यांतील मालक आणि भाडेकरू यांचे प्रश्न मिटवून वाडे वाचवले पाहिजेत, अशी मागणी या वाड्यांत राहणारे नागरिक करत आहेत. तर एका ज्येष्ठ नागरिकाच्या मते, त्यांची संबंधित वाड्यातील ही चौथी पिढी आहे. महापालिकेने या वाड्यांच्या डागडुजीसाठी बिनव्याजी कर्ज द्यावे, हे वाडे वाचले पाहिजेच, असे त्यांचे म्हणणे आहे. वारसा तर आहेच मात्र आर्थिक कारणास्तवर येथील लोक दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. त्यामुळे सबसिडीच्या स्वरुपात काहीतरी सरकारने करावे, मोफत नको असेही येथील नागरिकांनी म्हटले आहे.
‘वाडे खाली करणार नाही’
आम्हाला नोटीस आली की वाईट वाटते. मुलांच्या नोकऱ्या खूप चांगल्या नाहीत. त्या खासगी आहेत. त्यामुळे आर्थिक भार सोसत नाही. शिवाय औषध पाण्याचा खर्च असतो. तर नोटीस दिली तरी हे वाडे स्वत:चे असल्यामुळे खाली करणार नसल्याचे येथील रहिवाशांचे मत आहे.