Pune News : पुणे मनापाचे 1400 कोटींचे गिफ्ट, कोणाला काय मिळणार?
Pune mahanagar palika : पुणे शहर मनपाने नागरिकांना चांगलेच गिफ्ट दिले आहे. यामुळे नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाली आहे. महानगरपालिकेच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.
अभिजित पोते, पुणे : पुणे शहराचा चौफेर विस्तार झाला आहे. यामुळे २०२१ मध्ये पुणे परिसरातील २३ गावांचा महानगरपालिकेत समावेश केला होता. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट गावांना महापालिकेकडून मोठं गिफ्ट मिळाले आहे. यामुळे या गावांचा चौफेर विकास होणार आहे. गावात अनेक पायाभूत सुविधा निर्माण होणार आहे. यामुळे मनपात समावेश होऊन विकास होत नाही? हा आरोप आता या गावातील नागरिकांना करता येणार आहे. या गावातील विकास कामांसाठी तब्बल 1400 कोटींचे गिफ्ट पुणे मनपाने दिले आहे.
काय होतील कामे
पुणे मनपात समाविष्ट गावात एकूण 15000 चेंबर्स आणि 204 किलोमीटरच्या ड्रेनेज लाईन उभारण्यात येणार आहे. जायका प्रकल्पातील 11 मैलपाणी शुद्धीकरण प्रकल्पाबरोबरच नव्या 23 गावांमध्ये विविध प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तसेच शहरातील देखील 6 शुद्धीकरण प्रकल्पाचे नूतनीकरण होणार आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये 8 नवे मैल पाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी नव्या प्रकल्पांना परवानगी दिली आहे. पुणे महापालिकेकडून या प्रकल्पांना 1400 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे.
मनपाचा हा प्रकल्प रखडला
पुणे शहरातील बाईक प्रकल्प मंजुरी अभावी रखडला आहे. पुणे महापालिकेच्या ई बाईक सेवा सुरू करण्याच्या प्रकल्पाला परिवहन विभागाची अद्याप मंजुरी मिळाली नाही. शहरात एकूण 500 ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यासह सुमारे 5000 बाईक उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मनपाने तयार केला होता. त्यापैकी 350 ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यास महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने दिली आहे. मनपाने परवानगी दिली असली तरी परिवहन विभागाचा अद्याप निर्णय नाही. पुणे शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी भाडेतत्त्वावर महापालिका ई-बाईक सेवा देणार आहेत. परंतु एक वर्षापासून हा प्रकल्प परिवहन विभागाच्या मंजुरीच्या प्रतिक्षेत रखडला आहे.
हा बदल शक्य?
पुण्यात आणखी एका महापालिकेसाठी शासन स्तरावर हालचाली सुरू आहेत. हडपसर – वाघोली ही महापालिका तयार करा, अशी मागणी राजकीय नेत्यांसह समाजातील काही घटकांनी केली होती. या मागणीची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. आता नगरविकास विभागाचं पुणे महापालिकेला पत्र मिळाले आहे. त्यावर पुणे मनपाचे विभाजन करण्यासंदर्भात महानगरपालिकेकडे अभिप्राय मागवला आहे. एका आठवड्यात अभिप्राय राज्य शासनाकडे पाठवला जाणार आहे. यामुळे पुण्यात दोन महापालिका अस्तित्वात येणार का ? या प्रश्नाचे उत्तर काही दिवसांत मिळणार आहे.