पुणे महापालिका घेणार १ हजार कोटींचे कर्ज, कशासाठी घेणार कर्ज?
Pune municipal corporation : पुणे शहर महानगरपालिका १ हजार कोटींचे कर्ज घेणार आहे. त्यासंदर्भात एका वित्तसंस्थेशी पुणे महानगरपालिकेने करार केला आहे. पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार यांनी ही माहिती दिला.
पुणे : पुणे शहराची व्याप्ती वाढली आहे. पुणे परिसरातील अनेक गावांचा समावेश पुणे महानगरपालिकेत करण्यात आला आहे. त्या गावांमधील पायाभूत सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी पुणे महानगरपालिकेवर आली आहे. आता यासंदर्भात पुणे महानगरपालिकेने विचार सुरु केला आहे. पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात येणाऱ्या या गावांच्या विकासाठी 9 हजार कोटी रुपयांची मागणी पुणे महापालिकेनं राज्य सरकारकडे केली होती. परंतु सरकारकडून पुणे मनपाला निधी मिळाला नाही. यामुळे आता एक हजार कोटींचे कर्ज घेण्याचा निर्णय मनापाने घेतला आहे.
कशासाठी घेणार कर्ज
पुणे महानगरापालिकेत खडकवासला, किरकटवाडी, कोंढवे धावडे, मांजरी बुद्रुक, नांदेड, न्यू कोपरे, नऱ्हे, पिसोळी, शेवाळवाडी, काळेवाडी, वडाची वाडी, बावधन बुद्रुक, वाघोली, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभूळवाडी, होळकरवाडी, औताडे हांडेवाडी, सणसनगर, नांदोशी, सूस, म्हाळुंगे या २३ गावांचा समावेश केला गेला होता. महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांमध्ये मैलापाणी शुद्ध प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी पुणे महानगरपालिका एक हजार कोटींचे कर्ज घेणार आहे.
कोणासोबत केला करार
कर्ज घेण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी पुणे महापालिका प्रशासनाने इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनशी करार केला आहे. या करारानुसार आयएफसी महापालिकेला कर्ज पुरवठ्याकरण्याबाबत मार्गदर्शन करणार आहे. आयएफसीकडून या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल येणार आहे. त्या अहवालाचा अभ्यास करून महानगरपालिका कर्ज घेण्याचा निर्णय घेणार असल्याचे आयुक्त विक्रमकुमार यांनी सांगितले.
पुणे महापालिकेने आयएफसीशी कर्ज घेण्यासंदर्भात करार केला आहे. परंतु यासाठी महानगरपालिका कोणताही खर्च करणार नाही. आयएफसीकडून मोफत या प्रकल्पाचा अभ्यास मनपा करुन घेणार आहे. तो सविस्तर अहवाल मिळाल्यानंतर कर्जाचा निर्णय होणार आहे. पुणे महानगरपालिकेला निधी उपलब्ध झाल्यास २०२६पर्यंत २३ गावांमध्ये मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प कार्यन्वीत होण्याची शक्यता आहे. यामुळे लवकरच पुणे शहरासारखा विकास या २३ गावांमध्ये पोहचण्याची आशा निर्माण झाली आहे. यामुळे या गावांनाही आपण पुणेकर असल्याचे वाटणार आहे.