काय झाले, नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचे काम थांबवण्याचे महारेलचे पत्र
नाशिक-पुणे रेल्वे मार्गाला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अश्विनी वैष्णव यांच्यांशी चर्चा करुन या मार्गातील अडचणी दूर केल्याचे सांगितले होते.
पुणे : नाशिक-पुणे (Nashik-Pune) सेमी हायस्पीड ट्रेनने (Pune Nashik high Speed Train) प्रवास लवकरच सुरु होणार असल्याची घोषणा झाली होती. या रेल्वे प्रकल्पाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरु केली. परंतु आता महारेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉरपोरेशन (महारेल) ने भूसंपादनाचे काम थांबवण्याचे पत्र दिले आहे. नाशिक जिल्हाधिकारींना (Nashik District Officer) हे पत्र दिले आहे. भूसंपादन (Land Acquisition) साठी निधी नसल्यामुळे काम थांबण्यात येत आहे.
नाशिक-पुणे रेल्वे मार्गाला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अश्विनी वैष्णव यांच्यांशी चर्चा करुन या मार्गातील अडचणी दूर केल्याचे सांगितले होते. परंतु आता महारेलने निधीअभावी नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे मार्गाचे काम थांबवण्याचे पत्र दिले आहे. यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.
फडणवीस यांची मध्यस्थी
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मध्य रेल्वे मंत्रालयाने नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाला परवानगी न दिल्याचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यानंतर हा रेल्वे मार्ग होणार की नाही, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वे मंत्रालयाशी चर्चा करून समस्या सोडवल्या. तसेच नाशिक-पुणे महामार्गालगत औद्योगिक महामार्गाची घोषणा करण्यात आली.
सिन्नर तालुक्यातील २२ गावांमधून मार्ग
फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वे मार्गाबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासमोर सादरीकरण केले. यानंतर रेल्वेमंत्री वैष्णव यांनी या मार्गाला हिरवी झेंडी दाखवली. यानंतर राज्य सरकारने उपलब्ध करून दिलेल्या निधीतून जमिनीचे मूल्यांकन आणि भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
महारेलचे पत्र
दरम्यान, नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाला महारेल नाशिकचे मुख्य सल्लागार अशोक गरुड यांचे पत्र प्राप्त झाले आहेत. त्यात त्यांनी पुरेशा निधीअभावी भूसंपादनाची प्रक्रिया थांबविण्याचे म्हटले आहे. नाशिक जिल्ह्यातील नाशिक आणि सिन्नर तालुक्यातील २२ गावांतून हा रेल्वे मार्ग जाणार आहे. सिन्नरमधील 17 गावे आणि नाशिकमधील 5 गावांचे भूसंपादन केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी सिन्नर तहसीलमधून आतापर्यंत ४५ हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आले आहे.
कसा आहे प्रकल्प?
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी एकूण 235 किलोमीटर लांबीचा लोहमार्ग टाकण्यात येणार आहे. या मार्गावर एकूण 24 स्थानके असणार आहेत. या मार्गामुळे नाशिक-पुणे अंतर फक्त पावणेदोन तासांत पुर्ण करता येणार आहे. ही रेल्वे प्रतितास 200 किलोमीटर वेगाने धावणार आहे. दरम्यान, या रेल्वेच्या कामासाठी जमीन देण्यास काही शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.