पुणेः राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैशाली नागवडे (Vaishali Nagawade) यांना पुण्यातील कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांनी (Pune BJP) श्रीमुखात भडकावल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी अधिकच आक्रमक झाली आहे. भाजप कार्यकर्त्यांनी लगावलेली ही थप्पड फक्त राष्ट्रवादीच्या (Pune NCP) कार्यकर्त्यावरच नव्हे तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक आया-बहिणीच्या तोंडावर दिली आहे. भाजपाला याचा हिशेब द्यावाच लागेल. भाजपाला माफी मागावी लागेल, असा पवित्रा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी घेतला आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या पुण्यातील एका कार्यक्रमात वैशाली नागवडे महागाईविरोधातील निवेदन देण्यासाठी गेल्या होत्या. मात्र यावेळी वैशाली यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्या म्हणाल्या, ‘माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा ऐकल्यानंतर मी तत्काळ पत्रकार परिषद घ्यायचं ठरवं. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी वैशाली नागवडे हिच्या श्रीमुखात भडकावलं. त्या निवेदन गेऊन गेल्या होत्या. गॅसचे भाव 365 , 410 रुपयांचे 1000 पर्यंत पोहोचलेत. पेट्रोलचे भाव 110 पर्यंत पोहोचलेत. आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेला घर चालवावं हा प्रश्न पडलेला आहे. गॅसचं सिलेंडर संपलंय, पैसे कुठून आणायचे, पोटात आग पडलीय. हेच त्या निवेदनात होतं..’
विद्या चव्हाण पुढे म्हणाल्या, ‘स्मृती इराणी संवेदनशील आहेत, हे जाणून निवेदन द्यायला गेल्या होत्या. पण त्यांना अशी वागणूक मिळाली. ही थप्पड कोणत्याही राष्ट्रवादीच्या कार्यकर्तीच्या श्रीमुखावर नव्हे तर महाराष्ट्रात महागाईने होरपळलेल्या प्रत्येक आय बहिणीच्या तोंडावर मारली आहे. भाजपाला याचा हिशेब द्यावा लागणार आहे. माफी मागितली नाही तर या महाराष्ट्रात प्रत्येक महिला त्याला उत्तर देईल. महागाई कमी करण्याच्या उद्देशानं मोदी सरकार आलं होतं. या मोठ्या घोषणा दिल्या. आता फक्त महागाईवर चर्चा पाहिजे. गॅसचं सिलेंडर 410 रुपयांनाच मिळाले पाहिजे. पेट्रोल आणि डिझेल 60-70 रुपये लीटरच मिळाले पाहिजे.
पुण्यात सोमवारी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम होता. संध्याकाळच्या या कार्यक्रात राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवडे यांनी कार्यक्रमस्थळी म्हणजेच बालगंधर्वमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. याठिकाणी राष्ट्रवादीच्या वैशाली नागवडे यांना मारहाण झाली. भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला. बालगंधर्व सभागृहात भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी वैशाली नागवडे यांना मारहाण केल्याचा आरोप पुणे राष्ट्रवादीने केला आहे.