पुणे | 3 ऑगस्ट 2023 : पुणे शहरात दोन दशतवादी नुकतेच पकडले गेले होते. त्या दहशतवाद्यांचा शोध राष्ट्रीय तपास संस्था घेत होती. दीड वर्षांपासून पुणे शहरात ते राहत होते. त्यांच्यावर एनआयएने पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. एनआयएच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत ते होते. इम्रान खान आणि मोहम्मद युनूस साकी या दोन दहशतवाद्यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्यांना मदत करणाऱ्या अन् मास्टरमाइंड असलेल्या झुल्फीकार अली बडोदावाला याला पोलिसांनी अटक केली आहे. बडोदावाला त्या दहशवाद्यांना आर्थिक पुरवठा करत होता.
झुल्फीकार अली बडोदावाला याला अटक केल्यानंतर एटीएसने त्याला पुणे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. आर.कचरे यांच्या न्यायालयात हजर केले. यावेळी त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली. ही मागणी करताना बडोदावालासंदर्भात महत्वाची माहिती एटीएसकडून न्यायालयात दिली गेली. त्यात झुल्फीकार अली बडोदावाला याने दोघ दहशतवाद्यांना दहशतवादी कारवायांसाठी पैसे पुरवले, वेळोवेळी त्या दोघांचा संपर्कात तो होता, यामुळे त्याला कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने आरोपीला 11 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
झुल्फिकार बडोदावाला अटक केलेल्या 2 दहशतवाद्यांच्या मदतीने इतर अनेक लोकांना बॉम्बस्फोट घडवण्याचे प्रशिक्षण देत होता. महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान आणि महम्मद युसूफ महम्मद याकूब साकी यांची मदत घेऊन बडोदावाला बॉम्बस्फोट घडवण्याची चाचणी करत होता. पुण्यातील दिवेघाटात त्यांना प्रशिक्षण देत होता. एटीएसला बॉम्ब बनवण्याचे साहित्य याच जंगलातून मिळाले होते.
पुणे पोलिसांनी सुरुवातीला इम्रान खान आणि मोहम्मद युनूस साकी या दोघांना अटक केली होती. त्यावेळी त्यांचा तिसरा साथादार मोहम्मद शहनवाज (वय ३२) फरार झाला. तो अजूनही सापडला नाही. त्यानंतर या दोघांना घर देणारा आणि मदत करणारा अब्दुल पठाण याला अटक केली. त्याचबरोबर मेकेनिकल इंजीनिअर असलेला रत्नागिरीमधील पेंडारी येथील सीमाब नसरुद्दीन काजी पोलिसांच्या जाळ्यात आला. त्याने दोघं दहशतवाद्यांना मदत केली होती. आता झुल्फीकार अली बडोदावाला पोलिसांच्या जाळ्यात आला.