Pune Fire : पिंपरी चिंचवडमध्ये दुकानाला भीषण आग, एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू
चौघांचं आनंदी कुटुंब होतं. हार्डवेअरचं दुकान चालवून त्यांचा उदरनिर्वाह सुरु होता. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. नेहमीप्रमाणे काल रात्री कुटुंब जेवून झोपी गेलं आणि नियतीने आपला डाव साधला.
पिंपरी-चिंचवड / 30 ऑगस्ट 2023 : ऐन सणाच्या दिवशी पिंपरी-चिंचवडमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. पिंपरी चिंचवडमधील चिखली भागात एका हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. या आगीत दुकानात झोपलेले संपूर्ण कुटुंब जळून खाक झालं. पती-पत्नी आणि दोन मुलांचा आगीत जळून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. चिमणाराम चौधरी आणि ज्ञानुदेवी चौधरी अशी मयत पती-पत्नीची नावे आहेत. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवली. शार्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
पहाटेच्या सुमारास लागली आग
चिमणाराम चौधरी यांचे पिंपरी-चिंचवडमधील चिखली येथे सचिन हार्डवेअर नावाचे दुकान आहे. या दुकानातच चौधरी हे पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते. मंगळवारी रात्री चौधरी हे नेमहीप्रमाणे रात्री जेवून झोपी गेले. मात्र ती रात्र कुटुंबाची शेवटची ठरली. पहाटेच्या सुमारास दुकानाला अचानक आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, दुकानात झोपलेले संपूर्ण चौधरी कुटुंब यात जळून खाक झाले.
शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज
दुकानाला आग लागल्याचे लक्षात येताच नागरिकांनी अग्नीशमन दलाला आगीची माहिती दिली. माहिती मिळताच अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली. यानंतर चौघांचे मृतदेह बाहेर काढत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झालं. महापालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज अग्नीशमन दलाकडून व्यक्त करण्यात येत आहे. अग्नीसमन दल तपास करत आहे. तपासानंतर आगीचे नेमके कारण उघड होईल.