पंतप्रधान कार्यालयात अधिकारी असल्याचा बनाव पडला महागात, काय झाले तोतया अधिकाऱ्याचे?
Pune News : पंतप्रधान कार्यालयातील तोतया अधिकारी असलेला किरण पटेल याचे पुणे कनेक्शन काही महिन्यांपूर्वी समोर आले होता. आता पुन्हा एक तोतया अधिकारी पंतप्रधान कार्यालयात कार्यरत असल्याचा दावा करत होता. त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय.
अभिजित पोते, पुणे : सध्या तोतया अधिकारी बनून फसवणूक करण्याचा सपाटाच सुरु आहे. काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान कार्यालयातील उच्चपदस्थ अधिकारी असल्याचे सांगत गुजरातमधील किरण पटेल जाळ्यात आला होता. जम्मू-काश्मीरमध्ये पोलिसांची फसवणूक करणाऱ्या त्या ठगाला Z-Plus सुरक्षा व्यवस्था पुरवली गेली होती. त्याला बुलेटप्रूफ एसयूव्ही गाडी दिली गेली होती. त्याच्या राहण्यासाठी 5 स्टार हॉटेलची सुविधा केली गेली होती. मग त्या पठ्याने टॉप अधिकाऱ्यांच्या बैठकाही घेतल्या होता. तसेच त्याने SDM रँकच्या अधिकाऱ्यासोबत नियंत्रण रेषेचा (LOC) अनेक वेळा दौरा केला होता. आता पुन्हा एका तोतया अधिकारी उघड झाला आहे. हा पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी असल्याचा सांगत होता.
कोण केली फसवणूक
पंतप्रधानांचा डेप्युटी सेक्रेटरी असल्याचा बनाव करणारा तोतया आयएएस अधिकारी वासुदेव निवृत्ती तायडे याला पुण्यात अटक केली आहे. वासुदेव निवृत्ती तायडे (वय ५४, रा. रानवारा, तळेगाव दाभाडे, पुणे) याने पुण्यातील एका कार्यक्रमात आयएएस अधिकारी असल्याचे सांगत हजेरी लावली होती. त्याने ‘मी पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी आहे’, असे सांगत कार्यक्रमाला हजेरी लावली होती. पुण्यातील बॉर्डर लेस वर्ल्ड फाऊंडेशन संस्थेच्या कार्यक्रमामध्ये तो आला होता. जम्मू-कश्मीर येथे जवानांच्या मदतीसाठी पाठवण्यात येणारी रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याला तो उपस्थित होता.
काय केला दावा
या कार्यक्रमात हा आरोपी पंतप्रधान कार्यालयातील डेप्युटी सेक्रेटरी असल्याचे सांगत बनाव करत होता. वासुदेव तायडे याने आपली खोटी ओळख सांगून लोकांची फसवणूक केली. या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात कलम ४१९, १७० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापूर्वी झाला होता प्रकार
पुणे शहरात कॉमनवेल्थ व्होकेशनल यूनिवर्सिटी किंगडम ऑफ टोंगा आहे. त्या विद्यापीठाने पंतप्रधान कार्यालयातील बनावट अधिकारी असलेला किरण पटेल याला सल्लागार नेमले होते. विद्यापीठ प्रशासनाकडे किरण पटेल याचा प्रोफाईल आला होता. त्यानंतर विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन अहमदाबादमध्ये किरण पटेल याची भेट घेतली. त्याच्याशी चर्चा झाली. त्या चर्चेने अधिकारी चांगलेच प्रभावित झाले होते.