पुण्यात पर्यटकांसाठी खडकवासला चौपाटी, सिंहगड किल्ला बंद, काय आहे कारण
Defense Minister Rajnath Singh in Pune : रविवारच्या सुटीमुळे सिंहगडाकडे जाणाऱ्या पुणे शहरातील नागरिकांना नो एन्ट्रीच्या निर्णयास सामोरे जावे लागले. सिंहगड आणि खडकवासला चौपाटी पर्यंटनासाठी दोन दिवस बंद केली आहे.
अभिजित पोते, पुणे : पुणे शहरात वीकेंडसाठी सिंहगड किल्ला किंवा खडकवासला चौपटीवर चांगलीच गर्दी असते. शनिवार आणि रविवारी अनेक जणांची पावले पर्यटनासाठी या ठिकाणी वळतात. परंतु रविवारी या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांना नो एन्ट्रीच्या समस्येला समोरे जावे लागले. रविवारी आणि सोमवारी (१४ आणि १५ मे) रोजी सिंहगड किल्ला आणि खडकवासला चौपटी पर्यंटकासाठी बंद करण्यात आली आहे. सिंहगडावर सुट्टीच्या दिवशी होत असलेल्या प्रचंड गर्दीमुळे हा निर्णय घेतला नाही. त्यासाठी वेगळेच कारण आहे.
काय आहे कारण
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खडकवासला चौपाटी व सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. खडकवासला धरणाला लागून असलेल्या उन्नत प्राद्योगिक संरक्षण संस्था (डीआयएटी) येथे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह १५ मे रोजी येणार आहे. परंतु विकेंड साजरा करण्यासाठी खडकवासला व सिंहगड या भागात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.
कधीपर्यंत राहणार बंद
खडकवासला चौपाटी व सिंहगड किल्ला उद्या दुपारी २ पर्यंत राहणार बंद राहणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या दौऱ्यात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून हा निर्णय घेतला आहे. परंतु कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक ही कार्यवाही करण्यात आल्याने पर्यटक नाराज झाले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या दौऱ्यात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून खडकवासला चौपाटी व सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद केल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
रविवारी गड बंद असल्याचे पर्यटकांना सांगण्यात आले. अनेक पर्यटक लांबून आले होते. त्यांना गड का बंद आहे, याची माहिती मिळत नव्हती.