सरपंच होण्याचा मार्ग मोकळा… पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर; अर्ज कधी भरायचा? मतदान केव्हा? वाचा सविस्तर
पुणे जिल्ह्यातील 388 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कोणी स्वत: निवडणुकीला उभं राहण्याच्या तयारीत आहे. तर कुणी बायको, बहीण, आई, भावजय यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत.
अभिजीत पोते, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 4 ऑक्टोबर 2023 : ज्या निवडणुकांची राज्यातील सर्वचजण वाट पाहत होते. अखेर त्या निवडणुका होणार आहेत. त्या म्हणजे ग्रामपंचायतीच्या निवडणुका. अर्थात संपूर्ण राज्यात निवडणुका होणार नाहीत. फक्त पुणे जिल्ह्यात होणार आहेत. पुणे जिल्ह्यातील नव्या आणि जुन्या अशा मिळून 388 ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. त्यामुळे पुणेकरांमधून आनंद व्यक्त केला जात आहे. या निवडणुकीमुळे काहींचा सरपंच होण्याचा तर अनेकांचा पंचायत समिती सदस्य होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने या निवडणुका जाहीर केल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुकांसाठी येत्या 16 ऑक्टोबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. जानेवारी ते डिसेंबर दरम्यान सदस्यांची मुदत संपणाऱ्या आणि जिल्ह्यात नव्याने स्थापन झालेल्या सुमारे 231 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक आणि 157 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत.
5 नोव्हेंबरला मतदान, 6 ला निकाल
16 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 5 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 6 नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जाणार आहेत. त्यामुळे इच्छुकांनी तिकीट मिळावं म्हणून पक्षश्रेष्ठींकडे जोरदार लॉबिंग सुरू केली आहे. या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्याने पुणे जिल्ह्यातील गावागावांमध्ये फक्त निवडणुकीचीच चर्चा सुरू झाली आहे.
कोणत्या गावात किती जागांवर निवडणुका?
निवडणुका होत असलेल्या 388 ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक भोर, खेड तालुक्यातील प्रत्येकी 46 ग्रामपंचायती आहेत. त्या पाठोपाठ आंबेगाव, जुन्नर, मुळशी तालुक्यातील ग्रामपंचायतींची संख्या आहे. आंबेगाव तालुक्यात 44, जुन्नरमध्ये 41, बारामतीमधील 32 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. दौंड, शिरूर मधील प्रत्येकी 16, इंदापूर आणि हवेलीतील प्रत्येकी 14, वेल्हे आणि मावळमधील प्रत्येक 31, पुरंदरमधील 22, मुळशीतील 37 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.
सीमोल्लंघन होणार?
राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. सत्तेत शिवसेनाही आहे आणि राष्ट्रवादीही. आणि विरोधातही शिवसेनाही आहे आणि राष्ट्रवादीही. अर्थात शिवसेनेत जसे दोन गट पडलेत. तसेच राष्ट्रवादीतही दोन गट पडले आहेत. त्यामुळे इच्छुकांना तिकीट मिळवण्यासाठी मोठी संधी आहे. त्यामुळे अनेकजण या पक्षातून त्या पक्षात जाऊ शकतात. दसऱ्यापूर्वीच इच्छुकांचं हे सीमोल्लंघन सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावागावातील राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे.