‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी रुपाली चाकणकर उत्सुक; म्हणाल्या…
Rupali Chakankar on Assembly Election 2024 : विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी रुपाली चाकणकर तयार; 'या' मतदार संघातून उमेदवारी मागणार
पुणे : 2024 च्या निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक आहेत. अशात सगळ्याच पक्षात निवडणूक लढण्यास उत्सुक असलेली नेते मंडळी मतदारसंघावर दावा करत आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनीही पुणे जिल्ह्यातील मतदारसंघाच्या उमेदवारीवर दावा सांगितला आहे. आपल्याला विधानसभा निवडणुकीचं तिकीट मिळावं, अशी अपेक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केली आहे.
पुणे जिल्ह्यातील खडकवास विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळावी, अशी मागणी करणार असल्याचं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.
मी खडकवासला मतदारसंघात या आधीच उमेदवारी मागितली आहे. राष्ट्रवादीचं या मतदारसंघातील काम मी आधीपासूनच सुरु केलं आहे. मी अनेक पदावर काम केलं आहे. तो अनुभव पाहता उमेदवारी मिळावी, अशी इच्छा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातूनच मी उमेदवारी मागणार आहे, असं चाकणकर म्हणाल्या आहेत.
रुपाली चाकणकर दुसऱ्या पक्षातून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत, असं बोललं जात आहे. त्यावर ज्या लोकांनी तुम्हाला सांगितलं की मी दुसऱ्या पक्षातून इच्छुक आहे त्यांची आणि माझी एकदा मला भेट घालून द्या. कारण मला या गोष्टी तुमच्याकडूनच समजत आहेत, असं चाकणकर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
शरद पवारसाहेबांनी मला राज्य महिला आयोगावर काम करण्याची संधी दिली. पवार साहेबांनी सर्वसामान्य कुटुंबाच्या महिलेला काम करण्याची संधी दिली. खडकवासला मतदार संघात अनेक समस्या मला फिरताना जाणवत आहेत. याचं नियोजन होणे गरजेचं आहे. जर या मतदारसंघाची उमेदवारी मिळाली तर मी या समस्या सोडवण्यासाठी काम करेन, असं चाकणकर म्हणाल्या.
महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी हिरकणी कक्ष असावा. शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात तो असलाच पाहिजे ही कायद्यामधली तरतूद आहे. असं असून सुद्धा हिरकणी कक्ष कार्यरत होताना दिसत नाहीत, असं त्यांनी म्हटलं.
हिरकणी कक्ष विश्रांतीगृह म्हणून वापरला गेला दुर्दैवाने अशा पद्धतीचे जर अशा काही घटना घडत असतील तर ते अत्यंत चुकीचं आहे. महिला आयोगाच्या वतीने आजच्या बैठकीमध्ये तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. इथून पुढच्या काळामध्ये पुणे महानगरपालिकेमधला हिरकणी कक्ष हा हिरकणी कक्ष म्हणूनच वापरला जाईल. कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीसाठी त्याचा वापर होणार नाही अशा पद्धतीचा वापर आढळल्यास किंवा चुकीच्या घटना घडल्यास असंबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई केली जाईल, असा इशारा चाकणकरांनी यावेळी दिला.