पुणे : पुणे जिल्ह्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण पुणे शहर हादहले आहे. एका व्यक्तीने विवाहीत महिलेकडे लग्नाचा प्रस्ताव दिला. परंतु त्या महिलेने नकार दिला. त्यानंतर त्या महिलेच्या 15 महिन्यांच्या बाळाला उकळत्या पाण्यात आरोपीने टाकले. गरम पाण्याने बालक गंभीररित्या भाजले आणि उपचारादरम्यान १८ एप्रिल रोजी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे.
नेमके काय घडले
पुणे शहराजवळील चाकनजवळ असलेल्या पिंपळगाव येथील ही घटना आहे. याबाबत पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी सांगितले की, आरोपीला दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. मुलाची आई त्याच्याशी लग्न करण्यास तयार नसल्याने त्याने त्याचा राग मुलावर काढला. महिला घरी नसताना आरोपीने मुलाला उकळत्या पाण्याच्या बादलीत टाकले. त्यानंतर मुल चुकून बादलीत पडले, असा कांगावा केला. परंतु महिलेच्या बहिणीने आरोपीला मुलाला गरम पाण्याच्या बादलीत टाकताना पाहिले होते. आरोपीने तिला गप्प बैस अन्यथा तुलाही मारुन टाकेल, अशी धमकी दिली होती.
त्यानंतर समजली हकीगत
उकळत्या पाण्यात टाकल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या मुलास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु १८ एप्रिल रोजी त्याचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर महिलेच्या बहिणीने तिला सर्व हकीकत सांगितली. यानंतर, मुलाच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली. आरोपीवर भादंवि 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.