Online Job | एक लाईक करा अन् 50 रुपये कमवाच्या चक्करमध्ये असा फसला की गमावले 1 कोटी
नेहमी ऑनलाईन असणारे सायबर चोरटे फसवणुकीसाठी ग्राहक शोधत असतात. नवीन नवीन शक्कल लढवून जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असतात. मग तुम्ही त्यांच्या सापळ्यात अडकताच तुमची आयुष्यभराची कमाई लंपास करतात. पुणे शहरात नुकताच असा प्रकार घडलाय.
पुणे : ऑनलाइन Fraud करण्याच्या घटना गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहे. ऑनलाईन असणारे सायबर चोरटे नवीन नवीन शक्कल लढवून तुम्हाला जाळ्यात ओढतात. मग तुम्ही त्यांच्या सापळ्यात अडकताच तुमची आयुष्यभराची कमाई लंपास करतात. पुणे शहरातील माजी सैनिकाची अशीच फसवणूक झाली आहे. या प्रकारात माजी सैनिकाच्या पाच बँकांमधील सुमारे एक कोटी रुपये गेले आहेत. त्यांची सर्व बचत, सेवानिवृत्ती लाभ आणि आणि मुलाकडून घेतलेले सर्व पैसे गेले आहेत. ही रक्कम 1 कोटी रुपये आहे.ऑनलाइन कामाच्या संधीतून ही फसवणूक झालीय. एक लाईक करा अन् 50 रुपये कमवाच्या या माध्यमातून ही फसवणूक झाली आहे.
नेमके काय घडले
पोलिसांमध्ये दाखल तक्रारीनुसार, ऑनलाइन फसवणूक 13 ते 26 फेब्रुवारी दरम्यान झाली होती, मात्र माजी सैनिकाने मागील आठवड्यात पुणे सायबर पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत त्यांनी म्हटले की, गेल्या वर्षी एक मेसेजिंग अॅप डाउनलोड केला होता, ज्यामुळे ग्रुप चॅटिंग करता येते. तिथे त्याला एका अनोळखी व्यक्तीचा मेसेज आला, ज्यामध्ये त्याला सोप्या कामांसाठी खूप पैसे मिळत असल्यचा दावा केला गेला. हे काम म्हणजे व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्मवर लाईक बटणावर क्लिक करण्याचे होते. सुरुवातीला केलेल्या कामाचे त्यांना वेलकम बोनस म्हणून 1,000 मिळाले. फसवणूक करणाऱ्यांनी त्यांना या कामांवर अधिक परतावा देण्यासाठी गुंतवणुकीची ऑफर दिली. त्यांनी पैसे जमा केले अन् आयुष्यभराची पुंजी गेली.
अशी गेली रक्कम
पोलिसांनी सांगितले की, माजी सैनिकाकडे 60 लाख रुपयांची बचत आणि सेवानिवृत्तीची रक्कम होती. तसेच त्यांने मुलाकडून 40 लाख रुपये घेतले होते. जमा केलेल्या पाच बँकांच्या 12 खात्यांमधून सायबर चोरट्यांनी हे पैसे काढले.
पोलिसांचा आवाहन
पोलिसांनी ऑनलाईन चोरट्यांकडून फसवणूक टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. लोकांनी अनोळखी व्यक्तीशी कोणताही व्यवहार करुन नये, आपले ओटीपी व बँक खात्याची माहिती कोणाला देऊ नये, सोशल मीडियावर आपली वैयक्तीक माहिती देऊ नये, असे आवाहन केले आहे.
काय काळजी घ्यावी
- ऑनलाइन कामे करून पैसे कमविण्याची संधी देणार्या कोणत्याही मेसेज किंवा जाहिरातींवर विश्वास ठेऊ नका.
- जेव्हा केव्हा तुम्हाला ऑफर मिळेल तेव्हा ती नीट तपासा.
- तुमचे बँकिंग तपशील अनोळखी व्यक्तींसोबत कधीही ऑनलाइन शेअर करू नका.
- तुम्ही फसवणुकीला बळी पडल्याचा संशय असल्यास तत्काळ पोलिसांना कळवा.