संगणक अभियंत्यांचा ग्रुप पानशेत धरणावर फिरायला गेला, पाण्यात उतरला, मग घडली दुर्देवी घटना
धरणाच्या पाण्यात उतरणे संगणक अभियंत्याच्या जीवावर बेतले. मोहीतला वाचवण्यासाठी मित्रांनी शर्थीचे प्रयत्न केले. सर्वजणांनी मानवी साखळी तयार केली. त्यामाध्यमातून मोहीतला पाण्यातून वर काढण्याचा खूप प्रयत्न गेला. यावेळी अनशुल अमेठा हा सर्वात पुढे होता.
विनय जगताप, वेल्हा, पुणे : पुणे शहरात संगणक कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या मित्रांनी फिरण्याचे नियोजन केले. पुणेकरांचे आकर्षण असलेल्या पानशेत धरणाकडे फिरायला गेले. पोहता येत नसताना पाण्यात उतरण्याचा मोहसुद्धा त्यांना आवरता आला नाही. मग दुर्देवी घटना घडली. त्यातील परप्रांतीय युवक पुण्यात कंपनीच्या बैठकीसाठी आला होता. पण त्याची ती बैठकही शेवटची ठरली.
काय घडली घटना
मित्रांसोबत फिरायला आलेल्या परप्रांतीय तरूणाचा पुण्याच्या वेल्हा तालुक्यातल्या पानशेत धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलीय.वेल्हा तालुक्यातील धिंडली गावात असणाऱ्या रिसॉर्ट परिसरातील धरणाच्या बॅक वॅाटरच्या पाण्यात पाय घसरून पडल्यानं तरुणाचा मृत्यू झालाय.मोहीत हेमंत सराफ असं मृत्यू झालेल्या 30 वर्षीय संगणक अभियंत्याचे नाव आहे. 14 तासांच्या शोध मोहिमेनंतर मृतदेह शोधण्यात रेस्क्यू टीमला यश आलय. तो मध्य प्रदेशातील आहे.
बैठकीसाठी आला होता
मोहीत हेमंत सराफ हा मध्य प्रदेशातील सागर येथील रहिवाशी आहे. पुणे शहरातील बाणेर येथील एका खासगी आयटी कंपनीच्या मीटिंगसाठी तो पुण्यात आला होता. ७ एप्रिल दुपारी तीन वाजता मीटिंग संपल्यानंतर कंपनीतील मुले आणि मुली यांचा ग्रुप पानशेत धरणाजवळील धिंडली (ता. वेल्हे) येथील आर्यावत रिसॉर्टवर कॅम्पिंगसाठी आला होता. सायंकाळी ५.३० वाजता सर्व जण रिसोर्टवर पोहचले. रिसोर्ट फिरल्यानंतर मित्रांसह सर्वजण पानशेत धरणाचे बॅकवॅाटर पाहण्यासाठी पायी चालत गेले. धरणाच्या बॅकवॅाटरच्या पाण्यात गुडघाभर पाण्यात सर्वजण गेले. यावेळी मोहीम सराफ हा पाय घसरुन खोल पाण्यात पडला. त्यानंतर निखिल किशोर बडगुजर हा देखील पाण्यात पडला. परंतु निखील जमिनीजवळ असलेल्या दगडाला धरुन तो वर आला.
मित्रांचे मोहीतला वाचवण्यासाठी प्रयत्न
मोहीतला वाचवण्यासाठी मित्रांनी शर्थीचे प्रयत्न केले. सर्वजणांनी मानवी साखळी तयार केली. त्यामाध्यमातून मोहीतला पाण्यातून वर काढण्याचा खूप प्रयत्न गेला. यावेळी अनशुल अमेठा हा सर्वात पुढे होता. त्याचा देखील पाय घसरु लागल्याने तो पाण्याच्या बाहेर आले. यावेळी मोहीत सराफ हा खोल पाण्यात बुडाला. कोणालाही पोहता येत नसल्याने त्याचे प्राण वाचवू शकले नाहीत.
१४ तास चालली शोध मोहीम
पाण्यात पडलेल्या युवकाचा १४ तासाच्या शोध मोहिमेनंतर सकाळी नऊच्या दरम्यान मृतदेह मिळून आला असल्याची माहिती पानशेत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक महेश कदम यानी दिली. यावेळी मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती व्यवस्थापक अध्यक्ष प्रमोद बलकवडे, रुशीकेश शिवतरे, तानाजी भोसले, हनुमंत नवले, आबाजी जाधव, राजू प्रधान, निखील, यांनी मदतकार्य केले. वेल्ह्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पानशेत पोलीस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक महेश कदम, पोलीस हवालदार पंकज मोघे, राजाराम होले अधिक तपास करीत आहेत.