Municipal election 2022 : पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकेतले महिला आरक्षण आज होणार जाहीर; इच्छुकांची धाकधूक वाढली!
राज्य निवडणूक आयोगाने 14 महापालिकांना 31 मेपर्यंत प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्याचे आदेश दिले. अशावेळी आज राज्यातील महापालिकांची आरक्षण सोडत निघणार आहे.
पुणे : आगामी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका (Pune & Pimpri Chinchwad Municipal Corporation) निवडणुकीसाठीचे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला आरक्षण (Reservation) आज होणार निश्चित आहे. पुणे महापालिकेतील 58 प्रभागातील 173 जागांसाठीचे तर पिंपरी चिंचवड शहरातील 46 प्रभागांचे आरक्षण आज अकरानंतर जाहीर होणार आहे. ओबीसी आरक्षण वगळून अन्य आरक्षणे निश्चित होणार असल्याने पुणे महापालिकेतील 165 नगरसेवकांपैकी किती नगरसेवकांना पुन्हा संधी मिळणार, याचे चित्र स्पष्ट होणार आहे. आरक्षणाची सोडत स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे काढली जाणार आहे. महापालिकेची सदस्यसंख्या 173 आहे. तर महिला आरक्षण असल्याने महिलांची सदस्यसंथ्या 87 एवढी होणार आहे. तर 29 महिलांना लॉटरी पद्धतीने आरक्षण द्यावे लागेल, कारण 87मधून 58 जागा या राखील असणार आहेत. दरम्यान, लॉटरी (Lottery) पद्धतीमुळे अनेकांचे लक्ष याकडे लागलेले आहे. अनेकांची धाकधूक वाढली आहे.
पिंपरी चिंचवडमधील स्थिती काय?
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत 46 प्रभाग, तर नगरसेवक संख्या 139 असणार आहे. 139 नगरसेवकांपैकी 69 पुरुष, तर 70 महिला नगरसेविका अशी वर्गवारी असेल. 139 नगरसेवकांपैकी 3 जागा अनुसूचित जमातीसाठी, तर 22 जागा अनुसूचित जातीसाठी राखीव असतील. ओबीसी आरक्षण मिळाले असते तर 38 जागा ओबीसींसाठी राखीव राहिल्या असत्या. आरक्षणाविना निवडणूक होण्याची शक्यता असल्याने ओबीसी प्रवर्गातून लढण्याची 38 जणांची संधी गेली आहे. त्यामुळे 114 जागांवर खुल्या प्रवर्गातून निवडणूक होईल. सोडतीनंतर प्रभागांचे आरक्षण 1 जून रोजी प्रसिद्ध केले जाईल.
इतर महापालिकांचेही आरक्षण आजच होणार जाहीर
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील या आरक्षण सोडतीकडे शहरातली सर्व इच्छुकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पुणे आणि पिंपरी चिंचवडसह इतर शहरांतील आरक्षणही आजच जाहीर होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने 14 महापालिकांना 31 मेपर्यंत प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्याचे आदेश दिले. अशावेळी आज राज्यातील महापालिकांची आरक्षण सोडत निघणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवारांसह संपूर्ण राज्याचं लक्ष याकडे लागले आहे. मुंबई, नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली आणि ठाणे महापालिकांचा समावेश आहे.