आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात मोठा खुलासा, दोन आरोपी ताब्यात
पुणे शहरात भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची अपहरण आणि हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा तपास करण्यासाठी अनेक पथकं कामाला लागली आहेत. आरोपींनी वाघ यांची हत्या का केली? याचा तपास पोलीस करत आहेत.
महाराष्ट्र विधान परिषदेचे भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे अपहरण आणि हत्येच्या घटनेमुळे पुणे शहर हादरलं आहे. सतीश वाघ यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात पोलिसांचे विविध पथक काल पहाटेपासून कामाला लागले आहेत. अखेर पोलिसांनी या प्रकरणात आता मोठी कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे. पुणे पोलिसांनी सतीश वाघ यांचे अपहरण करणाऱ्या 2 आरोपींना ताब्यात घेतलं आहे. पवन शर्मा आणि नवनात गुरसाळे असं ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींना वाघोली येथून ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. आता या प्रकरणात काय-काय खुलासे होतात? ते पाहणं महत्त्वाचं आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी या घटनेबाबत ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणी पुणे पोलिसांची कारवाई प्रगती पथावर आहे. या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींबद्दल लवकरच स्पष्ट केले जाणार आहे. तसेच सतीश वाघ हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एकूण 16 पथक रवाना करण्यात आले आहेत. हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही”, अशी प्रतिक्रिया सहाय्यक पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली.
सहाय्यक पोलीस आयुक्त नेमकं काय म्हणाले?
“ही घटना गंभीर होती. या प्रकरणात प्राधान्यक्रम ठरवून पोलीस आयुक्तांपासून सर्व पोलीस कर्मचारी तपासात व्यस्त आहेत. पोलीस ठाणे आणि पोलीस आयुक्तालयांकडून 10 पथक आणि क्राईम ब्रांचकडून 6 पथक तयार करण्यात आले होते. हे सर्व पथक या प्रकरणात तपास करत आहेत. पोलिसांनी सर्व प्रकारे मग ती टेक्निकल किंवा इतर असतील अशा सर्व अंगांनी तपास केलेला आहे. या तपासात पोलीस प्रगती करत आहेत”, असं सहाय्यक पोलीस आयुक्त मनोज पाटील म्हणाले.
नेमकं काय घडलं होतं?
सतीश वाघ हे शेवाळवाडीत राहायचे. ते काल पहाटे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. या दरम्यान पुणे-सोलापूर मार्गावर एका ब्ल्यू बेरी हॉटेल बाहेर चारचाकी गाडीतून आलेल्या आरोपींनी सतीश वाघ यांचे अपहरण केले होते. अज्ञात आरोपींनी सतीश वाघ यांना जबरदस्ती गाडीत बसवत अपहरण केलं होतं. संबंधित घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने त्यांच्या अपहरणाची घटना समोर आली होती. या प्रकरणी सतीश वाघ यांच्या मुलाने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. यानंतर पोलिसांचे वेगवेगळे पथकं त्यांचा शोध घेत होते. पण पोलिसांचा तपास सुरु असतानाच 12 ते 13 तासांनी त्याचदिवशी संध्याकाळी सतीश वाघ यांचा मृतदेह घाटात आढळला. यामुळे एकच खळबळ उडाली. आता या प्रकरणाचा पोलिसांकडून सखोल तपास सुरु आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यातही घेतलं आहे. आरोपींनी सतीश वाघ यांची हत्या का केली? याचं गूढ अजून समोर आलेलं नाही. ते लवकर समोर येईल, अशी आशा आता वर्तवली जात आहे.