Pune Crime News | पुणे पोलिसांकडून मानवी तस्करीचे रॅकेट उघड, सौदी अरेबियात महिलांची केली विक्री
Pune Crime News | पुणे पोलिसांनी मानवी तस्करीचे मोठे रॅकेट उघड केले आहे. पोलिसांनी सौदी अरेबियात महिलांची विक्री करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. तो लाखो रुपये घेऊन महिलांची विक्री करत असल्याचा प्रकरणातील आरोपी आहे.
पुणे | 22 सप्टेंबर 2023 : दोन दिवसांपूर्वी राज्य महिला आयोगाने पुणे शहरातील तीन महिलांची सौदी अरेबियातून सुटका केली होती. या महिलांना नोकरीचे आमिष दाखवून सौदीत नेले होते. त्या ठिकाणी त्यांचा छळ केला जात असल्याचा प्रकार उघड झाला होता. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने त्या तीन महिलांची सुटका झाली होती. हे प्रकरण ताजे असताना पुणे शहरातून मानवी तस्करीचे रॅकेट उघड झाले आहे. पुण्यातून सौदी अरेबियात महिलांची विक्री होत होती. या प्रकरणी सूत्रधारास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
काय होता प्रकार
राज्यातील महिलांची सौदी अरेबियात विक्री होत असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या प्रकरणात एम. फैय्याज ए. याह्या याला मुंबईत अटक केली आहे. तो बेंगळुरु येथील रहिवाशी आहे. याह्या हा त्याचे पाच सहकाऱ्यांसोबत मानवी तस्करी करत होता. त्याचे सहकारी अब्दुल हामिद शेख, हकीम, रहीम आणि शमीमा या फरार आहेत.
नोकरी लावण्याचे आमीष
आरोपी नोकरी लावण्याचे लालच देऊन महिलांना सौदी अरेबियात पाठवत होते. पोलीस निरीक्षक युवराज शिंदे यांनी सांगितले की, मुंबईतील आरोपींच्या ए.ए. एंटरप्राइजेवर छापा टाकला. या कंपनीमार्फत महिलांची भर्ती करुन ते सौदीत पाठवत होते. पोलिसांनी याच ठिकाणी एम. फैय्याज ए. याह्या याला अटक केली. त्याला न्यायालयापुढे उभे केले असता पोलीस कोठडीत पाठवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
चार, चार लाखांत महिलांची विक्री
याह्याला याने सौदी अरेबियात महिलांना चार, चार लाखांत विकले होते. सौदी अरेबियातील एजंटकडून यासंदर्भात माहिती मिळाली. त्यानंतर पुणे पोलिसांनी आरोपींना अटक केली. सौदी अरेबियातील एजंटने आपण या महिलांना चार, चार लाखांत विकत घेतल्याचे म्हटले होते. यामुळे मानवी तस्करीचे मोठे रॅकेड उघड झाले आहे. आता फरार आरोपीच्या शोध पोलीस घेत आहेत.