पुणे : गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील पोलीस भरती रखडली होती. त्यामुळे सैन्य दलात किंवा पोलीस दलात आपलं नशीब आजमावणारी तरुणाई आस लावून बसली होती. अखेर पोलीस भरती (police bharti 2023) जाहीर झाल्याने तरुणाईला मोठा आनंद झाला होता.परंतु पुण्यात पोलिस भरतीसाठी (Pune Police) जावे लागणाऱ्या तरुणांना आता थांबावे लागणार आहे. 18 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी दरम्यान भरती प्रक्रिया बंद ठेवण्यात येणार आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. त्याची माहिती पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली. सुरुवातीला 500 उमेदवारांची भरती प्रक्रिया होत होती. परंतु, नंतरच्या काळात दोन हजार उमेदवारांची भरती प्रक्रिया सुरु झाली.
66 हजार 142 अर्ज आले होते
पुणे पोलीस दलातील जागा भरण्यासाठी अर्ज मागवण्यात आले होते. 720 पोलिस शिपाई पदासाठी तब्बल 66 हजार 142 अर्ज आले होते. पोलीस शिपाई आणि चालक पदाकरिता भरती होणार होती. चालक पदाकरिता 6 हजार 843 जणांचे अर्ज दाखल झाले आहेत. या जागा भरण्यासाठी तीन जानेवारीपासून प्रक्रिया राबवणे सुरु होते. परंतु कसबा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 18 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी दरम्यान भरती प्रक्रिया बंद ठेवण्यात येणार आहे.
चालक पदासाठी 870 नावांची निवडसूची
पोलिस शिपाई चालक पदाची भरती प्रक्रियासाठी 3 ते 17 जानेवारी दरम्यान उमेदवारांची मैदानी चाचणी प्रक्रिया पार पडली. मैदानी चाचणीत यशस्वी झालेल्या व वाहन चाचणीस पात्र झालेल्या एकूण 870 उमेदवारांची तात्पुरती निवड यादी लावण्यात आली होती.
पुणे शहर पोलिसांच्या संकेतस्थळावर ही प्रसिध्द केली होती. या उमेदवारांपैकी जाहिरातीत नमूद केलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात ही निवड सूची तयार केली आहे. यासंदर्भात आक्षेप किंवा तक्रार नोंदवण्यासाठी 19 फेब्रुवारी पर्यंत पोलीस नियंत्रण कक्ष, पुणे येथे ई-मेलवर लेखी अर्जाद्वारे करावे.
राज्यातील बहुतांश ठिकाणचे तरुण गेल्या दोन महिन्यांपासून पोलीस भरतीचा सराव करत होते. राज्यभरातून जवळपास चौदा हजार जागांसाठी अठरा लाखाहून अधिक अर्ज प्राप्त झाले होते., पुण्यातही शारीरिक आणि मैदानी चाचणीला सुरुवात झाली होती. परंतु कसबा पेठेतील पोटनिवडणुकीमुळे ही प्रक्रिया स्थगित केली.