‘शेवटचं सांगतो, अशी कारवाई करणार की सात जन्म लक्षात राहील’, पुणे पोलीस आयुक्तांचा गुन्हेगार आणि त्यांच्या टोळींना मोठा इशारा
पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी खंडणी आणि दरोडेखोरीच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी गुन्हेगारांना कठोर कारवाईचा इशारा दिला असून, खंडणी मागणाऱ्यांना शहर सोडण्याचा इशारा दिला आहे.
पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार चांगलेच अॅक्शन मोडवर आले आहेत. पुण्यातील खंडणी आणि दरोडेखोरीच्या घटनांना आळा बसावा यासाठी त्यांच्याकडून प्रचंड प्रयत्न केले जात आहेत. पण तरीही काही गुन्हेगारांकडून तसे गुन्हे केले जात आहेत. अशा गुन्ह्यांना आळा बसावा यासाठी आता पोलीस कमिश्नर अमितेश कुमार हे आक्रमक झाले आहेत. त्यांनी सर्व गुन्हेगार आणि त्यांच्या टोळींना सज्जड दम दिला आहे. खंडणीच्या माध्यमातून दहशत निर्माण करणारे आणि सर्वसामान्य जनतेची लुटमार करणाऱ्या गुन्हेगारांना सात जन्म लक्षात राहील, अशी कारवाई करु असा इशारा पुणे पोलीस आयुक्तांनी दिली आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे डॅशिंग आयपीएस अधिकारी आहेत. त्यांची जेव्हा पुण्यात बदली झाली होती तेव्हा त्यांनी पुण्यातील सर्व गुन्हेगारांची पोलीस ठाणे आवारात परेड काढली होती. पुण्यातील गुन्हेगाराच्या घटनांना आळा बसावा यासाठी त्यांच्याकडून सातत्याने प्रयत्न केले जात असतात. यावेळीदेखील त्यांनी आता आक्रमक पवित्रा घेत गुन्हेगारांना मोठा इशारा दिला आहे.
अमितेश कुमार यांनी गुन्हेगारांना नेमका काय इशारा दिला आहे?
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्यातील गँग्जना थेट इशारा दिला आहे. जर कोणी खंडणी मागून पैसे कमावत असाल, बळाचा वापर करुन जर कोणी घर खाली करायला सांगत असाल तर शेवटचं सांगण आहे, शहर सोडून जा. अन्यथा अशी कारवाई करणार की सात जन्म लक्षात राहील. अवैध धंद्याच्या माध्यमातून ज्यांना पैसे कमावण्याची मस्ती आली आहे त्यानं थेट सूचना देतोय. कोणाचीही मस्ती खपवून घेतली जाणार नाही
पुणे आयुक्तांच्या चारही परिमंडळ विभागाला महत्त्वाच्या सूचना
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्यातील चारही परिमंडळ विभागाला महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. चोरीचा माल जर पोलीस स्टेशनला असेल तर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन परत करा. पुणे शहरात जर बेवारस वाहन आढळली तर त्याची चौकशी करा. शहरातील चोरी करणाऱ्या चोरांची तपासणी करा, अशा सूचना पोलीस आयुक्तांनी दिल्या आहेत. पुण्यातील मुद्देमाल वितरण कार्यक्रमात पोलीस आयुक्तांनी या सूचना केल्या.