पोलीस आयुक्तालयातील शिपाई पदासाठी लेखी परीक्षा 5 ऑक्टोबरला, तयारी अंतिम टप्प्यात
Police recruitment | भरती प्रक्रियेत पहिल्यांदाच शारीरिक चाचणीच्या अगोदर लेखी परीक्षा घेतली जात आहे. त्यासाठी 22 सप्टेंबरपासून उमेदवारांना ऑनलाइन प्रवेशपत्र मिळायला सुरुवात झाली होती.
पुणे: पुणे पोलिस दलात रिक्त असलेल्या शिपाई पदासाठी येत्या 5 ऑक्टोबरला लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस आयुक्तालयातील शिपाई पदासाठीच्या या जागांसाठी मोठी चुरस पाहायला मिळत आहे. अवघ्या 214 जागांसाठी 39,323 जणांनी अर्ज केले आहेत.
भरती प्रक्रियेत पहिल्यांदाच शारीरिक चाचणीच्या अगोदर लेखी परीक्षा घेतली जात आहे. त्यासाठी 22 सप्टेंबरपासून उमेदवारांना ऑनलाइन प्रवेशपत्र मिळायला सुरुवात झाली होती. आयुक्तालयाची लेखी परिक्षा जी. एस. सॉफ्टवेअर कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षांबाबत उडालेल्या गोंधळानंतर ही परीक्षा सुरळीत पार पडणार का, हे पाहावे लागेल.
पुणे पोलिस दलात रिक्त असलेल्या 214 जागांसाठी 2019 मध्ये जाहिरात देण्यात आली होती. मात्र, गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या साथीमुळे ही भरती प्रक्रिया लांबणीवर पडली होती. मात्र, आता ही प्रक्रिया पुन्हा सुरु झाल्याने उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला होता.
राज्यातील 12538 पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया लांबणीवर
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जानेवारी महिन्यात पोलीस खात्यात 12538 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. पहिल्या टप्प्यात 5300 जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडेल. तर उर्वरित जागा या दुसऱ्या टप्प्यात भरण्यात येतील, असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले होते. मात्र, मराठा आणि आता ओबीसी आरक्षणाच्या तिढ्यामुळे ही भरती प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.
पोलीस भरती प्रक्रियेतील बदलांविरोधात विद्यार्थ्यांचा मोर्चा
यापूर्वी 2019 साली पोलीस भरती प्रक्रियेत करण्यात आलेल्या बदलांविरोधात पुण्यात मोर्चा काढण्यात आला होता. पोलीस भरतीसाठी आधी 100 गुणांची मैदानी चाचणी घेतली जात होती.त्यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जात असे. अशाप्रकारे 200 गुणांतून सर्वाधिक गुण मिळवणाऱ्यांची निवड केली जात असे. पण आता राज्य सरकारने यामध्ये बदल केला होता. लेखी परीक्षा मैदानी चाचणीच्या आधी घेण्यात येणार आहे. तसेच मैदानी चाचणीचे गुण 100 वरुन 50 करण्यात आले होते. या निर्णयावर अनेक विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवला होता.
आरोग्य विभागातील गट क आणि ड वर्गाची परीक्षा 25 आणि 26 सप्टेंबरला
राज्य सरकारच्या आरोग्य विभागात होणारी गट क आणि ड वर्गाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 8 आणि 9 सप्टेंबरला ही परीक्षा होणार होती. मात्र, परीक्षेचं कंत्राट दिलेल्या कंपनीच्या गोंधळामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. एकूण 6 हजार 185 पदांसाठी ही भरती परीक्षा होणार होती. त्याऐवजी आता 25 सप्टेंबर गट क आणि 26 सप्टेंबरला गट ड संवर्गाची परीक्षा होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या:
अनंत चतुर्दशीला पुणे बंद! फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहणार, अजित पवारांकडून स्पष्ट
पुणे महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार! सातवा वेतन आयोग लागू
खडकवासला धरण 100 टक्के भरलं, पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली, पुणेकर निर्धास्त!
(Pune Police force recruitment 2021 written exam will be held on 5 October 2021)