पुणे | 31 जुलै 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने उद्या गौरविण्यात येणार आहे. तसेच मोदी यांच्या हस्ते अनेक विकासकामांचं उद्घाटन होणार आहे. त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाच्या स्थानिक नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दोन्ही गटाच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मोदी यांच्या दौऱ्यावेळी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत पाटील यांनी गो बॅक प्राईम मिनिस्टर अशा घोषणा करणार असल्याचं म्हटलं आहे. तर भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांनी देखील आंदोलनाला आंदोलनाने उत्तर देण्याचा इशारा दिला आहे.
दोन्ही बाजूने सुरु असलेले वक्तव्ये पाहता पुणे पोलीस सतर्क झाले आहेत. त्यामुळे पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. पुणे पोलिसांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या नेत्यांना नोटीस बजावली आहे. पुणे पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना नोटीस बजावली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावेळी आंदोलनाचा इशारा दिल्याने पुणे पोलिसांची प्रशांत जगताप यांना नोटीस बजावली आहे. पुणे पोलिसांची प्रशांत जगताप यांना आंदोलन न करण्याची नोटीस बजावली आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 149 नुसार पुणे पोलिसांनी प्रशांत जगताप यांना नोटीस बजावली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक पक्ष उद्या पुणे शहरात आंदोलन करणार आहेत. त्याच अनुषंगाने आंदोलनकरता कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांकडून नोटीस बजावण्यास सुरुवात झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्या सकाळी 10.15 वाजता पुणे विमानतळावर आगमन होईल. ते 10 वाजून 40 मिनिटे या वेळेत हेलिकॉप्टरद्वारे कृषी महाविद्यालयात येतील. त्यानंतर मोदी यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची पूजा केली जाईल. त्यानंतर ते लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात दाखल होतील. तिथे 11.45 वाजेपर्यंत लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचं वितरण केलं जाईल. या कार्यक्रमात मोदींना पुरस्कार देवून गौरविण्यात येईल. त्यानंतर 12 वाजूम 45 मिनिटांनी मोदी 2 मेट्रो मार्गांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांचं लोकार्पण करणार आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील अलका चौक, स्वारगेट, फर्ग्युसन कॉलेज रोड, जंगली महाराज रोड, पुणे विद्यापीठ चौक, टिळक रोड, शिवाजी चौक, कुमठेकर रोड, लक्ष्मी रोड, सिमला ऑफीस चौक, संचेती चौक, संगमवाडी रोड, गोल्फ कल्ब चौक, विमानतळ रोड, स गो बर्वे चौक, गाडगीळ पुतळा चौक, बुधवार चौक आणि सेवासदन चौक हे प्रमुख मार्ग सकाळी 6 ते दुपारी 3 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद असणार आहेत.