तुला आम्ही कोण आहे ते दाखवितो म्हणत…चक्क पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण
Pune Police : पुणे शहरातील पोलीस चौकीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. दोन आरोपींनी पोलीस चौकीत येऊन पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण केली आहे. या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे : पोलिसांचा दरारा असतो. लहान मुले रडायला लागले म्हणजे त्यांना पोलिसांची भीती दाखवली जाते. पण पोलीस ठाण्यात येऊन पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण झाल्याचा प्रकार नुकताच घडला. …तुला आम्ही कोण आहे, ते दाखवितो, तुझी वर्दी उतरवतो…असे म्हणत पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण करण्यात आली. पुण्यातील या प्रकारानंतर दोन आरोपींना अटक करण्यात आली. परंतु या घटनेत पोलीस उपनिरीक्षकांना दुखापत झाली आहे.
काय आहे प्रकार
अक्षय पांडुरंग माळवे (वय २३, रा. कात्रज) याच्याबरोबर प्रीतम चुन्नीलाल परदेशी आणि त्याची आई सुजाता चुन्नीलाल परदेशी (दोघे रा. कात्रज गाव) यांची भांडणे झाली. या प्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. या कारणावरुन प्रीतम परदेशी अन् सुजाता परदेशी पुण्यातील कात्रज पोलीस चौकीत आले. मोठमोठ्याने आरडाओरडा करु लागले. त्यावेळी रात्रपाळीला असलेले ठाणे अंमलदार पोलिस हवालदार जाधव यांनी त्यांना आरडाओरडा करु नका, असे सांगितले.
तुझी वर्दी उतरवितो…
प्रीतम परदेशी याने फिर्यादी पोलिस उपनिरीक्षक नितीन तानाजी जाधव (वय ३२) यांना ‘आम्ही कोण आहे ते तुला दाखवितो, तुझी वर्दी उतरवितो, माझ्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत, तू या चौकीला नवीन आहेस, आधी माझी माहिती काढ,’ अशी धमकी दिली. त्यानंतर जावध यांना प्रीतम याने जोराने ढकलून दिले. त्याची आई सुजाता हिने जाधव यांची कॉलर पकडून शिवीगाळ केली. प्रीतम याने त्याच्याकडील फुटलेल्या मोबाईलने फिर्यादीच्या उजव्या हाताच्या अंगठ्याजवळील बोटावर वार केला. त्यात जाधव यांना जखमी झाली.
हा प्रकार कात्रज पोलिस चौकीत घडला. याबाबत पोलिस उपनिरीक्षक नितीन तानाजी जाधव (वय ३२) यांनी भारती विद्यापीठ पोलिस चौकीत फिर्याद दिली. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.