पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट, आमदार सुनील टिंगरे यांचीदेखील पोलीस चौकशी, कारण…
"पोर्शे केस प्रकरणात ज्यांचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे संबंध आले किंवा संबंध असल्याच्या तक्रारी आल्या त्यांच्या सर्वांची चौकशी करण्यात आली", असं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं आहे.
पुण्याच्या पोर्शे कार अपघात प्रकरणी एक मोठी बातमी समोर येत आहे. पोर्शे कार अपघात प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांचीदेखील चौकशी झाल्याची माहिती समोर येत आहे. पुण्याते पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वत: याबाबत कबुली दिली आहे. पोर्शे केस प्रकरणात ज्यांचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे संबंध आले किंवा संबंध असल्याच्या तक्रारी आल्या त्यांच्या सर्वांची चौकशी करण्यात आली, असं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं.
पुण्यात कल्याणी नगर परिसरात एका नामांकीत उद्योजकाच्या मुलाने भरधाव गाडी चालवत दोन जणांना उडवलं होतं. या अपघात बाईकवर असलेले तरुण आणि तरुणी यांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर रस्त्यावरच्या नागरिकांनी कारमधील मुलांना मारझोड केली होती. यावेळी अपघात ठिकाणी आमदार सुनील टिंगरे गेले होते. एवढंच नाही तर सुनीट टिंगरे येरवाडा पोलीस ठाण्यातही गेले होते. त्यामुळे सुनील टिंगरे यांनी अल्पवयीन आरोपीला मदत केल्याचा आरोप केला जात होता.
सुनील टिंगरे यांनी संबंधित आरोप फेटाळले होते. तसेच त्यांनी फेसबुकवर सविस्तर पोस्ट शेअर करत भूमिका मांडली होती. या प्रकरणी आता पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सुनील टिंगरे यांचीदेखील चौकशी झाल्याचं सांगितलं आहे. सुनील टिंगरे पोलीस ठाण्यात गेले तेव्हा त्यांनी पोलिसांवर दबाव आणला किंवा नाही हे आताच सांगणं योग्य होणार नाही, असं पोलीस आयुक्त म्हणाले.
पोर्शे अपघात प्रकरणावरुन पुणे पोलिसांवर सडकून टीका झाली होती. संबंधित घटना ही साडेतीन महिन्यांपूर्वी घडली होती. या घटनेनंतर पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. पण पुणे पोलिसांनी या प्रकरणी नंतर जो तपास केला तेव्हा त्यामध्ये अनेक खुलासे झाले. अल्पवयीन मुलाच्या ब्लड टेस्टमध्ये फेरफार करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित रुग्णालयातील अधिकाऱ्यांनादेखील अटक केली होती. तसेच अल्पवयीन मुलाच्या आई-वडिलांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी अटकेतील आरोपींना अजूनही जामीन मिळालेला नाही. पोलीस या प्रकरणी सखोल तपास करत आहेत.