एमपीएससी आंदोलकांची पुणे पोलिसांकडून अखेर धरपकड करण्यात आली आहे. पुण्यातील शास्त्री रोडवर एमपीएससी विद्यार्थ्यांचं विविध मागण्यासाठी आंदोलन सुरु होतं. त्यांच्या या आंदोलनात आमदार रोहित पवार हे देखील सहभागी झाले होते. यानंतर सरकारने एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. तरीदेखील आंदोलक आपल्या इतर मागण्यांसाठी आंदोलनावर ठाम होते. दुसरीकडे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी मान्य केल्यानंतर पुणे पोलिसांनी आंदोलनाच्या ठिकाणी दाखल होत आंदोलकांची धरपकड केली. यावेळी आंदोलकांनी पोलिसांच्या या कारवाईला विरोध केला.
पुणे पोलिससांकडून धरपकड सुरु असताना एका आंदोलकाने माध्यमांना प्रतिक्रिया दिली. आंदोलक बेंबीच्या देठापासून पोलिसांचा प्रतिकार करत बोलत होता. “आमचं शांततेचं आंदोलन होतं. तीन दिवस झाले आम्ही पाणी सुद्धा पिलं नाही. आमच्या मागण्या रास्त आहेत. आम्ही शांतपणे उपोषण करतोय. आमच्या लाखो विद्यार्थ्यांच्या या मागण्या आहेत. महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या मागण्या मांडतोय”, असं आंदोलक म्हणाला.
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी आंदोलकांची भेट घेतली होती. सरकारने आंदोलकांची मागणी मान्य केली नाही तर मी स्वत: या आंदोलनात सहभागी होणार, असा इशारा माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांनी दिला होता.
पुणे पोलिसांनी कारवाईदरम्यान माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “त्यांची मागणी शासनाकडून मान्य करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी उपोषण सोडलं. उपोषण सोडल्यानंतर तिथे वारंवार मुलं बसत आहेत. तीन दिवसांपासून वाहतूक बंद आहे. आम्ही त्यांना वारंवार विनंती केली आहे. आमच्याकडे आता पर्याय नाही. आम्ही त्यांना ताब्यात घेतलं आहे. त्यांना आम्ही आता पोलीस ठाण्याला घेऊन जात आहोत”, अशी प्रतिक्रिया कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने दिली.